भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला 2-2 असे बरोबरीत रोखले. अखेरच्या 5 मिनिटांपर्यंत भारताकडे 2-1 अशी आघाडी होती, परंतु सिमोन गौगनार्डने बरोबरीचा गोल केला. अखेरच्या तीन मिनिटांत अनुभवी गोलरक्षक पी आर श्रीजेशने बेल्जियमचा गोल अडवला. भारताने 'C' गटात अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. गोल फरकाच्या जोरावर भारतीय संघ आघाडीवर आहे.
भारत आणि बेल्जियम यांच्यातील सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवून देणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार याचीच उत्कंठा होती. या लढतीपूर्वी उभय संघ 30 वेळा समोरासमोर आले होते आणि त्यात बेल्जियमने जय-पराजयाच्या आकडेवारीत 14-13 अशी आघाडी घेतली होती. तीन सामने अनिर्णीत सुटले. मात्र, विश्वचषक स्पर्धेतील तीन सामन्यांत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती.
रविवारच्या या सामन्यात बेल्जियमने पहिल्या पाच मिनिटांत सामन्यावर मजबूत पकड घेतली. पहिल्याच मिनिटाला मिळालेले दोन कॉर्नर परतवण्यात गोलरक्षक पीआर श्रीजेशला यश आले. मात्र, 8 व्या मिनिटाला अॅलेक्सांडर हेंड्रीक्सने कॉर्नरवर गोल करताना बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल करण्याचा केलेला प्रयत्न बेल्जियमच्या गोलरक्षकाने अडवला आणि पहिल्या सत्रात यजमानांना 0-1 अशा पिछाडीवर रहावे लागले.पहिल्या सत्रात बेल्जियमला तोडीस तोड खेळ केला. भारताला एकही पेलन्टी कॉर्नर मिळाला नाही, त्याउलट बेल्जियमला तीन कॉर्नर मिळाले आणि त्यातील एक कॉर्नरवर गोल करण्यात ते यशस्वी झाले. 20 व्या मिनिटाला दिलप्रित सिंगला सुवर्णसंधी मिळाली, परंतु ललित उपाध्ययच्या पासवर दिलप्रित गोल करण्यात अपयशी ठरला. आकाशदीप सिंगला हिरवे कार्ड मिळाल्याने भारताला दहा खेळाडूंनी खेळ करावा लागला. भारतीय खेळाडूंना चेंडूवर ताबा मिळवण्यास अवघत झाले होते. 26 व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंनी बेल्जियमच्या सर्कलमध्ये आक्रमण केले, परंतु बेल्जियमच्या खेळाडूंनी सतर्कता दाखवत यजमानांना गोल करण्यापासून रोखले. दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंचा खेळ उंचावलेला पाहायला मिळाला. तिसऱ्या सत्रात जराही वेळ वाया घालवता आक्रमणाला सुरुवात केली. 35 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु बेल्जियमचा गोलरक्षक व्हॅन अॅसने हरमनप्रीत सिंगचा गोल करण्याचा प्रयत्न अडवला. 39व्या मिनिटाला भारताला सलग दोन कॉर्नर मिळाले, परंतु त्यावर अपयश आले. मात्र, वरुणचा दुसरा प्रयत्नाने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळवून दिला आणि त्यावर हरमनप्रीतने गोल करताना 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. बरोबरीच्या गोलनंतर दोन्ही संघांमध्ये चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. बेल्जियनच्या चपळतेला भारतीय खेळाडूंना उत्तर देण्यास अवघड जात होते, परंतु त्यांनी तिसऱ्या सत्रात पाहुण्यांना रोखून ठेवले होते. चौथ्या सत्रात बेल्जियमने मॅन टू मॅन मार्किंग केली होती. त्यामुळे चेंडूवर कौशल्य दाखवूनही भारताला आघाडी घेता येत नव्हती. कोठाजीतने डावीकडून केलेल्या पासवर सिमरनजीत सिंगने गोल करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. या गोलने बेल्जियमचे धाबे दणाणले. अखेरच्या दहा मिनिटांत बेल्जियमने भारताच्या सर्कलमध्ये शिरकाव केला, पण भारताच्या बचावपटूंनी चोख कामगिरी केली. आघाडी घेतल्यानंतरही भारताच्या आक्रमणाची धार बोथट झाली नाही. सुमित, ललित उपाध्यय, कोठाजीत, आकाशदीप यांनी सुरेख खेळ केला. अखेरच्या पाच मिनिटांत बेल्जियमने गोलरक्षकाला माघारी बोलावले. 56 व्या मिनिटाला बेल्जियमच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.