भुवनेश्वर, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : ऑस्ट्रेलियाकडून 2014 मध्ये जेतेपदाच्या लढतीत घरच्या प्रेक्षकांसमोर झालेला पराभव नेदरलँड्सच्या चांगलाच जिव्हारी लागलेला. आज त्याची सव्याज परतफेड त्यांनी केली. भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सने 4-3 (2-2) अशा फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. जेतेपदाच्या लढतीत त्यांना बेल्जियमचा सामना करावा लागेल. नेदरलँड्सने सडन डेथमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
सुरेख पासिंग, योग्य ताळमेळचा खेळ करताना नेदरलँड्सने चेंडू आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. नेदरलँड्सच्या खेळाडूकडून चेंडू हिसकावण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या तीन- तीन खेळाडूंना संघर्ष करावा लागला. 9 व्या मिनिटाला ग्लेन स्कुर्मन आणि 20 व्या मिनिटाला सेव व्हॅन ॲसने गोल करताना पहिल्या सत्रात नेदरलँड्सला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सत्रात टीम हॉवर्डने गोल करून ऑस्ट्रेलियाची पिछाडी 1-2 अशी कमी केली. चौथ्या सत्रातील अखेरच्या सहा मिनिटांत नेदरलँड्सने खेळ उंचावला. तीन मिनिटे शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या कॉर्नरवर नेदरलँड्सच्या गोलरक्षकाने अप्रतिम बचाव केला. पण अखेरच्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने बरोबरीचा गोल करण्यात यश मिळवले. एडी ओकेंडेनने सर्कलवरून मारलेला चेंडू नेदरलँड्सच्या खेळाडूला लागून गोलजाळीत गेला आणि ऑस्ट्रेलियाने अखेरच्या क्षणाला 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला.
शूटआउटमध्ये पहिल्या पाच प्रयत्नांत दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन प्रयत्न अपयशी ठरले. 3-3 अशा बरोबरीमुळे सामना सडनडेथमध्ये गेला. त्यात नेदरलँड्सच्या गोलीने आपली कामगिरी चोख बजावली आणि नेदरलँड्सने 4-3 (2-2) अशा विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.