ठळक मुद्देनेदरलँड्सचा मलेशियावर 7-0 असा विजयजेरोन हेर्त्झबर्गर विजयात सिंहाचा वाटामलेशियाच्या कमकुवत बचावाचा पुरेपूर फायदा
भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : गत उपविजेत्या नेदरलँड्सने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मलेशियाचा 7-0 असा धुव्वा उडवला. जेरोन हेर्त्झबर्गर तीन गोल करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला मिर्को प्रुयसर, मिंक व्हेन डेर विर्डन, रॉबर्ट केपरमन आमि थिएरी ब्रिंकमन यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली.
'D' गटातील नेदरलँड्स आणि मलेशिया यांच्यातील सामन्यात गतउपविजेत्या नेदरलँड्सचे पारडे जड होतेच. विश्वचषक स्पर्धेत उभय संघ चारवेळा समोरासमोर आले आणि त्यात तीनवेळा नेदरलँड्सने बाजी मारली. आजची लढत होती ती नेदरलँड्सचा जेरोन हेर्त्झबर्गर आणि मलेशियाचा फैझल सारी यांच्यात. हेर्त्झबर्गरने 213 सामन्यांत 54 गोल्स केले आहेत, त्याउलट सारीने 223 सामन्यांत 104 गोल्स केलेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण वरचढ ठरणार याची उत्सुकता होती. सामन्याच्या 12व्या मिनिटाला हेर्त्झबर्गरने अप्रतिम मैदानी गोल करताना नेदरलँड्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर मलेशियाचा खेळ काही काळापुरता ढिसाळ झालेला दिसला. त्यांनी नेदरलँड्सच्या खेळाडूंना गोल करण्यासाठी बरीच वाट मोकळी करून दिली. दुसऱ्या सत्रात 21व्या मिनिटाला मिर्को प्रुयसरने नेदरलँड्सच्या खात्यात आणखी एक गोलची भर घातली. मलेशियाच्या बचावफळीतीत चुकांचा पुरेपूर फायदा उचलतान नेदरलँड्सच्या आक्रमणफळीने सुरेख मैदानी गोल केला. या सामन्यात ऑरेज आर्मीच्या रॉबर्ट केम्पेरमनने विक्रमाला गवसणी घातली. ऑरेंज आर्मीकडून त्याने 200 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा मान पटकावला. 29व्या मिनिटाला हेर्त्झबर्गरने आणखी एक गोल करताना न्यूझीलंडला पहिल्या सत्रात 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात नेदरलँड्सच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र झाली. 35व्या मिनिटाला मिंक व्हॅन डेर विर्डनने गोल करत त्यांची आघाडी 4-0 अशी वाढवली. त्यात 42 व्या मिनिटाला रॉबर्ट केम्पेरमनने भर घातली. नेदरलँड्सने तिसऱ्या सत्रापर्यंत 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती.चोथ्या सत्राच्या 57 व्या मिनिटाला थिएरी ब्रिंकमन आणि 60व्या मिनिटाला हेर्त्झबर्गरने यांनी गोल करताना नेदरलँड्सचा 7-0 असा विजय निश्चित केला.