भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : फ्रान्स आणि न्यूझीलंड हे उभय संघ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले. क्रमवारीत आघाडीवर असलेल्या न्यूझीलंडने अपेक्षेप्रमाणे खेळ करताना 'A' गटातील या सामन्यात 2-1 अशी बाजी मारली. 2013 नंतर या संघांमधील ही तिसरी आंतरराष्ट्रीय लढत होती आणि त्यात न्यूझीलंडने विजय मिळवून जय-पराजयाची आकडेवारी 2-0 अशी केली. उभय संघातील एक सामना बरोबरीत सुटला होता.
न्यूझीलंड आणि फ्रान्स यांनी बचावात्मक खेळावर भर ठेवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर न्यूझीलंडने 17व्या मिनिटाला खाते उघडले. केन रसेलने अप्रतिम मैदानी गोल करताना संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेंडूवर ताबा ठेवताना न्यूझीलंडने सावध खेळावरच भर दिला. फ्रान्सकडून आक्रमक खेळ झाला, परंतु त्यांच्या वाट्याला यश येत नव्हते. मात्र, त्यांनी न्यूझीलंडलाही 1-0 अशा फरकावरच बराच काळ रोखले होते.