ठळक मुद्देजर्मन संघाने पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केलेमार्को मिल्टकाऊने केला एकमेव गोलपाकिस्तानने बरोबरीच्या संधी गमावल्या
भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : जर्मन संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला 1-0 असे पराभूत केले. पाकिस्तानने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या जर्मनीला एका गोलवर समाधान मानण्यास भाग पाडून अन्य संघांना धोक्याचा इशाराच दिला आहे. पाकिस्तानला बरोबरीच्या संधी चालूनही आल्या होत्या, परंतु समन्वयाच्या अभावामुळे त्यांना हार मानावी लागली. 'D' गटातील आजच्या दुसऱ्या सामन्यात चुरशीचा खेळ पाहण्याची उत्सुकता होती. पाचवेळा विश्वचषक उंचावलेला पाकिस्तानचा संघ सलामीच्या लढतीत बलाढ्य जर्मनीचा सामना करायला उतरला होता. त्यामुळे गोलचा पाऊस पडण्याची अपेक्षा केली जात होती, परंतु दोन्ही संघांनी बचावावरच अधिक भर दिला. विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्यांदा समोरासमोर आलेल्या पाकिस्तान आणि जर्मनीने प्रत्येकी एकेक विजय मिळवले होते. जागतिक क्रमवारीत जर्मनी सहाव्या, तर पाकिस्तान 13व्या स्थानावर आहे. मध्यंतरानंतरचा खेळ अधिक रोमांचक होत गेला. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांनी सामन्याचा वेग अधिक वाढला. जर्मन संघाची बचावभिंत भेदण्यात पाकिस्तानला सातत्याने अपयश येत होते. 36 व्या मिनिटाला मार्को मिल्टकाऊने अप्रतिम मैदानी गोल करताना जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाकिस्ताननेही तोडीस तोड खेळ केला, परंतु त्यांना चालून आलेल्या सोप्या संधीचं सोनं करता आलं नाही. 41 व्या मिनिटाला जर्मनीला सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर त्यांना गोल करता आला नाही. चेंडूवर नियंत्रण राखण्यात पाकिस्तानी खेळाडूंना अपयश येत होते.शेवटच्या सत्रात सातत्याने प्रयत्न करूनही पाकिस्तानला बरोबरीचा गोल करता आला नाही. त्यांना सलामीच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले.