भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : इंग्लंड आणि चीन यांच्यामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील लढत चांगलीच रंगतदार झाली. या रोमहर्षक सामन्यात कोणता संघ बाजी मारेल, हे कळत नव्हते. पण अखेर या दोन्ही संघांना 2-2 अशी बरोबरी स्वीकारावी लागली.
सामन्याच्या पहिल्या सत्रातच दोन गोल पाहायला मिळाले. चीनच्या झीएओपिंगने सामन्याच्या पाचव्या मिनिटाला पहिला गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फार काळ चीनला टिकवता आली नाही. कारण इंग्लंडच्या मार्क ग्लेगहॉर्नने सामन्याच्या 14व्या मिनिटाला गोल केला आणि इंग्लंडने चीनशी 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या सत्रापर्यंत ही बरोबरी कायम होती.
सामन्याच्या चौथ्या सत्रात 48 व्या मिनिटाला इंग्लंडच्या लायम अन्सेलने गोल करत इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
चौथे सत्र संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना ही आघाडी कायम होती. पण सामन्याच्या 59व्या मिनिटाला चीनच्या डु टालाकेने निर्णायक गोल केला. या गोलमुळे चीनला हा सामना बरोबरीत राखता आला.