Hockey World Cup 2023 IND vs ENG : स्पेनवर पहिल्याच सामन्यात विजयाची नोंद करणाऱ्या यजमान भारताने हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य इंग्लंडला कडवी टक्कर दिली. इंग्लंडने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वेल्सचा ५-० असा पराभव केला होता, परंतु आज त्यांना एकही गोल करता आला नाही. सामना संपायला २० सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला अन् इंग्लंडच्या खेळाडूचा हा प्रयत्न गोल खांब्याला लागून अयशस्वी ठरला. अटीतटीचा हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
हॉकी वर्ल्ड कप २०२३ मध्ये स्पेनवर २-० असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान होते. या सामन्यात टीम इंडियाला विजयाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. मात्र पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांनी अनेक प्रयत्न केले मात्र तरीही गोल होऊ शकला नाही. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांना एकूण ११ पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, मात्र त्यावरही दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही.
खेळाच्या शेवटच्या १५ मिनिटांत टीम इंडियाचे फॉरवर्ड्स इंग्लंडच्या कॅम्पवर सातत्याने आक्रमण करत असल्याने भारताने खेळावर वर्चस्व राखले, परंतु असे असतानाही एकही गोल होऊ शकला नाही. अखेरच्या १९ सेकंदात इंग्लंडने मिळवलेल्या पेनल्टी कॉर्नरने भारतीय कॅम्पचा तणाव वाढवला असला तरी पुन्हा एकदा खांबाला आदळल्यामुळे गोल बचावला आणि अखेर सामना अनिर्णित राहिला.