भुवनेश्वर - अत्यंत चित्तथरारक लढतीत भारताने बेल्जियमवर मात करत वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेत प्रथमच आघाडीवीरांनी केलेला आक्रमक खेळ आणि शूटआऊटमध्ये गोलरक्षक आकाश चिकटे याने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर भारताने बेल्जियमला ३-२ अशा फरकाने मात दिली. निर्धारीत वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर सामना शूटआऊटमध्ये पोहोलचला. पण शूटआऊटमध्येही २-२ अशी बरोबरी झाली. त्यानंतर हरमनप्रीतने गोल करून भारताला ३-२ अशी आधाडी मिळवून दिली. तर आकाश चिकटेने अप्रतिम बचाव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.मायदेशात होत असलेल्या या स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेनुरूप झाली नव्हती. त्यामुळे आज बलाढ्य बेल्जियमविरुद्धच्या लढतीत खेळ उंचावण्याचे आव्हान भारतीय संघासमोर होते. दरम्यान, या लढतीती सुरुवातीपासूनच अटीतटीचा खेळ झाला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाना गोल करता न आल्याने गोलफलक गोलशून्य बरोबरी दाखवत होता. अखेर ३१ व्या मिनिटाला ही कोंडी फोडताना गुरजंत सिंगने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ ३६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करून ही आघाडी २-० अशी वाढवली. भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे असे वाटत असतानाच ३९ व्या मिनिटाला बेल्जियमच्या लॉईल लुओपार्ट याने गोल केला. त्यानंतर ४६ व्या मिनिटाला लॉईल लुओपार्टने पुन्हा एकदा गोल करून बेल्जियमला बरोबरी साधून दिली. मात्र लगेचच रुपिंदरपाल सिंग याने गोल करून भारताला पुन्हा आघाडीवर नेले. पण सेड्रिक चार्लियरने बेल्जियमसाठी तिसरा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता न अल्याने सामना शूटआऊटमध्ये पोहोचला.
चित्तथरारक लढतीत भारताची बेल्जियमवर मात, भारत वर्ल्ड हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 9:53 PM