इपोह - भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी अझलान शाह हॉकी स्पर्धेत आयर्लंडचा ४-१ ने पराभव केल्यानंतरही आधीच्या खराब कामगिरीमुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.काल आयर्लंडने भारताला ३-२ असा पराभवाचा धक्का दिला होता. आजच्या विजयामुळे हिशेब चुकता झाला. भारताकडून वरुण कुमार याने (पाचव्या, तसेच ३२ व्या मिनिटाला) दोन गोल केले. शीलानंद लाक्राने २८ व्या, तसेच गुरजंतसिंग याने ३७ व्या मिनिटाला एकेक गोल केला. आयर्लंडकडून एकमेव गोल ४८ व्या मिनिटाला ज्युलियन डेल याने नोंदविला.भारताने सुरुवात झकास केली. पाचव्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. एक पेनल्टी कॉर्नर वाया गेला, पण दुसºया पेनल्टी कॉर्नरवर वरुणने संघाचे खाते उघडले. दुस-या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक खेळ करताच २८ व्या मिनिटाला शीलानंदने प्रतिस्पर्धी गोलकीपरला चकवित आघाडी दुप्पट केली.३२ व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर वरुणने दमदार ड्रॅगफ्लिक करीत आघाडी ३-० अशी केली. गुरजंतने ३७ व्या मिनिटाला चौथा गोल केला. सिमरनजितसिंगच्या सुरेख पासवर तलविंदरने चेंडू गुरजंतकडे दिला. त्यावर पंजाबच्या युवा स्ट्रायकरने चेंडू अलगद गोलजाळीत ढकलला. ४८ आणि ५० व्या मिनिटांना भारताने संधी गमाविली नसती तर विजयाचे अंतर आणखी मोठे झाले असते. (वृत्तसंस्था)
अझलान शाह हॉकीत भारताला पाचवे स्थान, अखेरच्या लढतीत आयर्लंडवर ४-१ ने मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:36 AM