तौरंगा (न्यूझीलंड) : पदार्पणाच्या लढतीत प्रत्येकी दोन गोल नोंदविणारे विवेक सागर आणि दिलप्रीत सिंग यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने चौरंगी हॉकी मालिकेत जपानचा ६-० ने पराभव करीत पहिला विजय साकारला. बुधवारी झालेल्या या सामन्यात रूपिंदरपाल सिंह (७ वे मिनिट), विवेक प्रसाद (१२ आणि २८ वे मिनिट), दिलप्रीत सिंग (३५ आणि ४५ वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (४१ वे मिनिट) यांनी गोल केले.अपेक्षेप्रमाणे भारताने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. सामन्यात भारतीय खेळाडूंनी दिलेले पास, चेंडूवरील नियंत्रण आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात प्रवेश करण्याचे तंत्र या सर्व बाबी अव्वल दर्जाच्या होत्या. सातव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, या संधीचा फायदा घेण्यासाठी हरमनप्रीत पुढे सरसावला. हरमनप्रीतचा फटका चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. या वेळी अनुभवी रूपिंदपालने मिळालेल्या संधीचे सोने करीत १-० अशी आघाडी मिळवून दिली.यानंतर नवोदित विवेक प्रसाद, दिलप्रीत यांनी आश्वासक खेळ करून भारताची आघाडी वाढविली. या सामन्यात जपानी खेळाडूंचा भारतीय खेळाडूंच्या झंझावातापुढे निभावच लागला नाही. जपानी खेळाडूंना पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी मिळाली, मात्र या संधीचा त्यांना फायदा उचलता आला नाही. दुसरीकडे भारतीय बचावफळीने अखेरच्या सत्रापर्यंत भक्कम बचाव करीत जपानच्या आक्रमक फळीला रोखले. भारताचा सामना आज गुरुवारी बेल्जियमविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)
भारताची जपानवर ६-० ने मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:38 AM