चेन्नई : यजमान भारताने पुन्हा एकदा दिमाखात विजयी मार्ग पकडताना आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत मलेशियाचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याच वेळी रविवारी रंगलेल्या अन्य सामन्यात चीनने दक्षिण कोरियाला १-१ असे, तर जपानने पाकिस्तानला ३-३ असे बरोबरीत रोखले.
या दिमाखदार विजयासह भारताने सर्वाधिक ७ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली असून मलेशिया ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर कोरिया आणि जपान अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहे. एकतर्फी रंगलेल्या सामन्यात भारताने जबरदस्त वर्चस्व राखताना मलेशियाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. मलेशियाने पहिले दोन सामने जिंकत स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र, रविवारी त्यांना भारताविरुद्ध लयच सापडली नाही.
भारतीयांनी सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना सहज वर्चस्व मिळवले. सेल्वम कार्थी (१५वे मिनिट) याने पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर हार्दिक सिंग (वय ३२), हरमनप्रीत सिंग (४२), गुरजंत सिंग (५३) आणि जुगराज सिंग (५४) यांनी प्रत्येकी एक गोल करत मलेशियाचे कंबरडे मोडले. भारतीय संघ सोमवारी आपल्या पुढील सामन्यात दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जाईल.
चीन-दक्षिण कोरिया बरोबरी चीनने भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शन करताना बलाढ्य दक्षिण कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये १८ व्या मिनिटाला कर्णधार जाँगह्युन जाँग याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत दक्षिण कोरियाला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत कोरियन संघाने ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात मात्र चीनने मुसंडी मारली. ४३ व्या मिनिटाला चोंगकोंग चेनने अप्रतिम मैदानी गोल करत चीनला १-१ अशी बरोबरी साधून दिली. हीच बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिली.
दुसरीकडे, पाकिस्तान-जपान लढतही ३-३ अशी बरोबरीत सुटली. जपानकडून तनाका सरेन (१३ वे मिनिट), कातो रायोसेइ (३७) आणि ओहाशी मसाकी (४५) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानकडून राणा अब्दुलने नवव्या मिनिटाला गोल केल्यानंतर मुहम्मद खानने (२५ आणि ५५ मिनिटाला) दोन गोल केले.