चेन्नई : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या अखेरच्या राउंड रॉबिन सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० असा फडशा पाडला. या दिमाखदार विजयासह भारताने सर्वाधिक १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी, या पराभवासह पाकिस्तानची पाचव्या स्थानी घसरण झाली आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारतीय संघ जपानच्या आव्हानाला सामोरे जाणार असून, अन्य उपांत्य सामन्यात मलेशिया आणि दक्षिण कोरिया एकमेकांविरुद्ध भिडतील. मेजर राधाक्रिष्णन स्टेडियमवर भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. चाहत्यांकडून मिळालेल्या या जबरदस्त पाठिंब्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वासही दुणावला. पेनल्टी कॉर्नरची कमजोरी दूर ठेवत भारतीयांनी चारपैकी तीन गोल पेनल्टी कॉर्नरवरच नोंदवत आपला जलवा दाखवून दिला. या सामन्याआधीच उपांत्य फेरी निश्चित केल्याने भारतीय संघाने आत्मविश्वासाने सुरुवात करताना पाकिस्तानवर सुरुवातीपासून दडपण आणले.
कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याने १५व्या आणि २३व्या मिनिटाला गोल करत भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर जुगराज सिंगने ३६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवर गोल केला. दडपणाखाली आलेल्या पाकिस्तानकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत आकाशदीप सिंगने ५५व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल करत भारताचा विजय निश्चित केला.
जपानचा चीनला धक्काजपानने चीनचा २-१ असा पराभव उपांत्य फेरी गाठली. चौथ्या स्थानासाठी त्यांना भारताचा पाकविरुद्ध मोठा विजय आवश्यक होता. जपानकडून यामाडा शोटा (८वे मिनिट) व फुकुडा केंटारो (५४) यांनी गोल केला. चीनकडून आओ सुओझूने (५७)गोल केला. मलेशियाने द. कोरियाला १-० असे नमवले. मलेशियाच्या अझराई-अबु-कमलने गोल केला.