गोल्ड कोस्ट - येथे भारतीय महिला हॉकी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या भारतीय महिला संघाला २६व्या स्थानी स्थानावरील वेल्सने ३-२ असे धक्कादायकरीत्या नमविले. या अनपेक्षित पराभवाने भारतीय महिला संघाचा मार्ग अडखळता झाला आहे.‘अ’ गटाच्या या सामन्यात वर्चस्व राखल्यानंतरही अंतिम क्षणी स्वीकारलेल्या गोलमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीची ३० मिनिटे पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीयांनी झुंजार खेळ करत चांगले पुनरागमन केले होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये शानदार दोन गोल करत भारताने सामना बरोबरीत आणला होता. मात्र, अंतिम क्षणी वेल्सने निर्णायक गोल करत स्पर्धेतील पहिल्या अनपेक्षित निकालाची नोंद केली.लीसा डाले (७ वे मिनिट), सियान फ्रेंच (२६) व नताशा मार्क जोन्स (५७) यांनी प्रत्येकी एक गोल करत वेल्सच्या शानदार विजयात योगदान दिले. त्याचवेळी कर्णधार रानी रामपाल (३४) व निक्की प्रधान (४१) यांनी भारताचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. दखल घेण्याची बाब म्हणजे भारताने या सामन्यात तब्बल १४ पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. भारतीय महिलांचा दुसरा साखळी सामना शुक्रवारी मलेशियाविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)संधी गमावल्या...अनपेक्षित पराभव झाल्यानंतर कर्णधार रानीने म्हटले की, ‘आम्हाला अधिक आक्रमक हॉकी खेळावे लागेल. आम्ही दबावाखाली होतो. त्याचा परिणाम खेळावर झाला.’ त्याचप्रमाणे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनीही चिंता व्यक्त करताना म्हटले की, ‘आम्ही सहज गोल नोंदवण्याच्या संधी गमावल्या, ही खूप चिंतेची बाब आहे. पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची आमची टक्केवारी केवळ ३१ टक्के होती. आम्ही गोलपोस्टवर ५० टक्के हल्ले केले, परंतु नेम चुकले. वेल्सची गोलरक्षक रोसेन थॉमसने शानदार खेळ केला.’
भारताला बसला अनपेक्षित पराभवाचा धक्का, वेल्सने दिला ३-२ असा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 4:24 AM