माद्रिद : भारतीय महिला हॉकी संघाला यजमान स्पेनकडून चौथ्या लढतीत १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे.स्पेनसाठी लोला रेरा हिने शानदार फार्म कायम ठेवताना दोन गोल केले. तिने तिचा पहिला गोल १0 व्या आणि दुसरा ३४ व्या मिनिटाला केला. अन्य दोन गोल लुसिया जिमेनेजने १९ व्या आणि कारमन कानो हिने ३७ व्या मिनिटाला केला. भारताकडून एकमेव गोल उदिता हिने २२ व्या मिनिटाला केला.स्पेनने भारताला सलामीच्या लढतीत ३-0 असे पराभूत केले होते. दुसरा सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता; परंतु पाहुण्या भारतीय संघाने मुसंडी मारताना तिसरा सामना ३-२ ने जिंकला होता. तथापि, चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. स्पेनने भारतावर दबाव कायम ठेवताना पहिल्या पाच मिनिटांतच दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले होते; परंतु भारतीय संघाने हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले. स्पेनचा संघ सुरुवातीच्या २0 मिनिटांत खूप आक्रमक होता आणि त्यांनी त्यात दोन गोल केले.सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारताने पाहुण्यावर दबाव निर्माण केला. यावेळी सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण करत भारतीयांनी आपली पकड मजबूत करण्याचाही चांगला प्रयत्न केला. त्याचा फायदा २२ व्या मिनिटाला उदिताने केलेल्या गोलने मिळाला. तिने शानदार मैदानी गोल केला.तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने काही हल्ले केले. यामुळे पुन्हा एकदा भारतीय महिला स्पेनला धक्का देणार असेच दिसत होते. परंतु स्पेनच्या खेळाडूंनी भारतीयांचे आक्रमण यशस्वी होऊ दिले नाहीत. स्पेनच्या बचावफळीने भक्कम संरक्षण करताना सामना आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर दखल घेतली. दोन्ही संघांतील पाचवा आणि अखेरचा सामना सोमवारी खेळवला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
भारताचा पुन्हा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:47 AM