ढाका : सलग तीन विजयासह गटात अव्वल स्थान पटकावित १० व्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पुढची फेरी गाठणाºया भारतीय संघाला बुधवारी सुपर चारच्या पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.भारताने गटात सर्व सामने जिंकले होते आणि या स्पर्धेत भारतीय संघ सर्वच विभागात सरस भासत आहे. दक्षिण कोरियाविरुद्ध भारतीय संघ विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करेल. दुस-या बाजूचा विचार करता कोरियाला अद्याप छाप सोडता आलेली नाही. ‘ब’ गटात कोरिया संघ मलेशियानंतर दुसºया स्थानी राहिला.नवे प्रशिक्षक मारिन शोर्ड यांनी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर प्रथमच कुठल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने मोक्याच्या क्षणी शानदार कामगिरी केली. रमनदीप सिंग, आकाशदीप सिंग, ललित उपाध्याय व चिंगलेनसाना सिंग यांनी आघाडीच्या फळीत छाप सोडत अनेक मैदानी गोल नोंदवले. भारताची मधली फळीही नियंत्रित खेळ करीत आहे. त्यात सरदार सिंग व कर्णधार मनप्रीत सिंग यांनी मोर्चा सांभाळला आहे. बचाव फळीत अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग व युवा दीपसान तिर्की यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतासाठी चिंतेचा विषय म्हणजे पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यातील अपयश हे आहे. दरम्यान, हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर काही गोल नोंदवले आहेत.या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी बघता भारतीय संघ कोरियाविरुद्ध सहज विजय नोंदविण्याची शक्यता अधिक आहे. भारताने जपानचा ५-१ ने पराभव केल्यानंतर बांगलादेशचा ७-० ने धुव्वा उडवला. त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-१ ने पराभव केला. जागतिक मानांकनामध्ये भारत आता सहाव्या तर कोरिया १३ व्या स्थानी आहे.अनुभवी गोलकिपर पी.आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत दोन युवा गोलकिपर सूरज करकेरा व आकाश चिकटे यांनी मोक्याच्या क्षणी चांगला खेळ केला. कोरियाविरुद्धच्या लढतीत भारताला आत्ममश्गुल राहता येणार नाही. कोरिया संघ वेग व जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखला जातो. दरम्यान सुपर चारच्या अन्य लढतींमध्ये बुधवारी पाकिस्तानचा सामना ‘ब’ गटातील अव्वल स्थानावर असलेल्या मलेशियाविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)
भारत कोरियाविरुद्ध विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:44 AM