चेन्नई : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात शुक्रवारी जपानने भारताला बरोबरीत रोखल्यानंतर पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करणे संघाला कठीण गेल्याची कबुली देत मुख्य कोच क्रेग फुल्टोन यांनी आमचा संघ ‘परफेक्ट फिनिशिंग’पासून जास्त दूर नसल्याचे म्हटले आहे.
अशियाई चॅम्पियन जपानविरुद्ध भारताला १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यापैकी एकच गोल होऊ शकला. त्याआधी भारताने चीनचा ७-२ ने पराभव केला, त्या वेळी सहा गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले होते. फुल्टोन सामन्यानंतर म्हणाले, ‘मिळालेल्या संधी गमावणे ही प्रत्येक कोचसाठी चिंतेची बाब असते. योग्य संयोजन मैदानात असताना असे का घडले, यावर मंथन केले जाते.’
मलेशियाला नमविण्याचे अवघड आव्हानजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि तीन वेळेचा विजेता भारतीय संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या पुढील सामन्यात रविवारी मलेशियाविरुद्ध खेळेल तेव्हा विजय नोंदविण्यासाठी पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्याचे अवघड आव्हान संघापुढे असेल. कर्णधार हरमनप्रीतसिंग, वरुण कुमार, अमित रोहिदास आणि जुगराजसिंग हे पेनल्टी तज्ज्ञ असताना जपानने काल भारताला १-१ असे रोखले होते. दुसरीकडे मलेशियाने पाकिस्तानचा ३-१ ने आणि जपानचा ५-१ ने पराभव करीत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. संघाकडून फरहान अशारीने सर्वाधिक चार मैदानी गोल केले.