भुवनेश्वर : शनदार सुरुवातीनंतर यजमान भारतीय संघ अखेरच्या साखळी सामन्यात शनिवारी कॅनडाला नमवून विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहे.जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने क गटात चार गुणांसह अव्वल स्थान घेतले. आॅलिम्पिक रौप्य विजेत्या बेल्जियमचेही चार गुण असून भारत मात्र उत्कृष्ट गोलसरासरीच्या बळावर पुढे आहे. कॅनडा अािण द. आफ्रिका यांचा प्रत्येकी एक गुण असल्याने गोलसरासरीच्या आधारे कॅनडा तिसऱ्या स्थानी आहे. भारताने पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेला ५-० ने हरविल्यानंतर दुसºया सामन्यात बेल्जियमला २-२ असे रोखले. कॅनडाला बेल्जियमने २-१ ने हरविले, तर कॅनडा- द. आफ्रिका लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. गटात सर्वच संघांसाठी दारे उघडी असल्याने कुठलीही शिथिलता न बाळगता थेट विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे भारताचे प्रयत्न असतील. गुरुवारी जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असलेल्या फ्रान्सने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला अ गटात धूळ चारली. हॉकीत काहीही शक्य असल्याचे त्यांच्या विजयावरून सिद्ध झाले. (वृत्तसंस्था)
भारताची नजर बाद फेरीवर; आज कॅनडाचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:12 AM