चेन्नई : आत्मविश्वासाने खेळणारा भारतीय संघ शुक्रवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या उपांत्य सामन्यात जपानविरुद्ध भिडणार असून विजय मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण खेळ करण्याचे आव्हान असेल.
राउंड रॉबिन फेरीत चार विजय आणि एक ड्रॉ अशा कामगिरीसह गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज करणारा भारत या सामन्यात प्रबळ दावेदार म्हणून उतरेल. तरीही जपानकडून सावध राहावे लागेल. त्यांनीही या स्पर्धेत एकही पराभव पत्करलेला नाही. २०२१ च्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात ढाका येथे जपानकडून भारताचा ३-५ असा पराभव झाला होता.
मलेशिया द. कोरियाविरुद्ध भिडणारभारत-जपान लढतीआधी दुसऱ्या स्थानावर राहिलेला मलेशिया आणि तिसऱ्या स्थानी असलेला मागील विजेता दक्षिण कोरिया यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. मलेशियाने चार विजय नोंदविले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. सध्याचा फॉर्म पाहता कोरियाविरुद्ध मलेशिया संघ दावेदार वाटतो.पाकविरुद्धच्या कामगिरीचे कौतुकभारताचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानला ४-० अशी धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक करीत जपानविरुद्धही लय कायम राखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भारताने आतापर्यंत २० गोल केले; पण जपानविरुद्ध खराब फिनिशिंगचा फटका बसला होता. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याच्या संधी शोधाव्या लागतील. उपकर्णधार हार्दिक सिंगने म्हटले की, ‘चारही क्वाॅर्टरमध्ये कामगिरीत सातत्य राखावे लागेल. बॉक्सच्या आतमध्ये शॉट मारण्याचे आव्हान असेल. जपान आमच्यासाठी आघाडीचा प्रतिस्पर्धी संघ आहे. पाकच्या तुलनेत उत्कृष्ट गोलसरासरीमुळे त्यांनी उपांत्य फेरी गाठली. त्यांची बचावफळी प्रतिस्पर्धी आक्रमक फळीला मुळीच थारा देत नाही.’
हेड टू हेडसामने : ३३, भारत : २७, जपान : ०३, अनिर्णीत : ०३