टोकियो: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी टीमनं इतिहास घडवला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-० नं नमवत भारतानं उपांत्य फेरीत धडक दिली. आणखी २ विजय मिळवल्यास भारतीय महिला सुवर्णपदक जिंकतील. गटात अव्वल असलेला ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण जोशात मैदानावर उतरला होता. तर भारताची वाटचाल अडखळत झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं. मात्र मैदानावर भारताच्या पोरींनी शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन टीमला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र भारतानं जबरदस्त बचाव केला.
भारताच्या विजयानंतर मैदानाच्या अगदी शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या व्यक्तीचं नाव सोर्ड मारजेन. सोर्ड मारजेन यांनी ४ वर्षांपूर्वी महिला हॉकी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं. त्यावेळी भारतीय संघ ऑलिम्पिक स्पर्धेतून परतला. भारताला एकाही विजयाची नोंद करता आली नव्हती. संघ मायदेशी दाखल झाल्यानंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. संघ पुन्हा उभा करायचा. मारजेन यांनी हे आव्हान पेललं. आज भारतीय संघानं ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्यात मारजेन यांचा मोठा वाटा आहे.
मारजेन १० वर्षे हॉकी खेळले आहेत. महिला टीमच्या आधी त्यांनी पुरुषांच्या टीमलादेखील धडे दिले आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे महिला संघाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. मारजेन मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. लोकांचा उत्साह वाढवण्याचं काम त्यांना उत्तम जमतं. त्यांच्या याच गुणामुळे भारतीय महिलांचा जोश स्पर्धेत अगदी हाय राहिला.
चक दे इंडियामध्ये शाहरुख खाननं साकारलेला कबीर खान सगळ्यांनी पाहिला. मारजेन यांची कहाणीदेखील फारशी वेगळी नाही. भारतीय टीम कोणत्याही क्षणी कमजोर पडू नये म्हणून मारजेन यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मारजेन सरावादरम्यान कायम खेळाडूंसोबत मैदानावर असतात. प्रत्येक खेळाडूसोबतची त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे. खेळाडूंनी त्यांच्या समोर असलेले प्रश्न स्वत: सोडवावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात.
भारतीय महिला टीमच्या खेळात झालेल्या बदलात मारजेन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय संघाची विचारपद्धती बदलण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच गेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या ग्रेट ब्रिटनच्या संघाला भारतीय महिलांनी त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभूत केलं. वर्ल्डकपमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या स्पेनला भारतीय महिलांनी आव्हान दिलं. मारजेन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या महिलांचा खेळ दिवसागणिक सुधारत आहे.