नवी दिल्ली : ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला पोडियम स्थान मिळवण्यासाठी खेळाच्या सर्वच विभागात सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल,’ असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्राहम रीड यांनी रविवारी व्यक्त केले. प्रशिक्षक रीड अलीकडेच नेदरलँड, विश्व चॅम्पियन बेल्जियम व आॅस्ट्रेलियाविरुद्ध संपलेल्या एफआयएच प्रो-लीग सामन्यांतील संघाच्या कामगिरीमुळे खूश होते.ते म्हणाले, ‘एफआयएच हॉकी प्रो-लीगमध्ये सर्वांत चांगली बाब म्हणजे आम्ही जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध चांगला निकाल देण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. आत्मविश्वास उंचावला हे दाखविण्याचे हे पुढील पाऊल आहे. आम्ही ज्या गोष्टीवर मेहनत घेत आहोत त्याचा लाभ होत आहे. तरी आम्हाला केवळ सामन्यांमध्येच नाही, तर खेळाच्या प्रत्येक विभागावर सातत्याने मेहनत घेणे आवश्यक आहे.’हॉकी इंडियाने रविवारी पुरुष राष्ट्रीय शिबिरासाठी ३२ सदस्यीय संभाव्य खेळाडूंचा समूह जाहीर केला. हे शिबिर सोमवारपासून बेंगळुरूतील भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये सुरु होईल. रीड म्हणाले, ‘या शिबिरानंतर आम्ही जर्मनी व इंग्लंडमध्ये खेळण्यास जाऊ. यामुळे आम्हाला टोकियो २०२० आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक सुधारणा करण्यास फायदा होईल.’ (वृत्तसंस्था)>संभाव्य खेळाडूपीआर श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक, सूरज कार्केरा, हरमनप्रीत सिंग, दिलप्रीत सिंग, सुरेंद्रकुमार, बीरेंद्र लाकडा, रुपिंदर पाल सिंग, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास, कोथाजित सिंग खडगंबाम, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद, सिमरनजित सिंग, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, एस.व्ही. सुनील, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, गुरसाहिबजित सिंग, शमशेर सिंग, वरुण कुमार, जरमनप्रीत सिंग, दीप्सन तिर्की, नीलम संदीप जेस, जसकरन सिंग, राजकुमार पाल, गुरजंत सिंग, सुमित, चिंग्लेनसाना सिंग
सर्वच विभागात वर्चस्व गाजवावे लागेल, भारतीय हॉकी प्रशिक्षक रीड यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 4:06 AM