पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताने बुधवारी त्यांचा १६ सदस्यीय संघ जाहीर केला. संघात पाच खेळाडूंना ऑलिम्पिक पदार्पणाची संधी दिली गेली आहे आणि संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करेल, तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. हरमनप्रीतचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची सांगड घातली गेली आहे. टोक्यो २०२० आणि रिओ ऑलिम्पिक २०१६चा कर्णधार मनप्रीत सिंग आणि पीआर श्रीजेश हे संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. कृष्णा बहादूर पाठकचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. भारताच्या मुख्य संघात श्रीजेश हा एकमेव गोलरक्षक आहे.
जर्मनप्रीत सिंग, संजय, राजकुमार पाल, अभिषेक आणि सुखजीत सिंग हे या संघातून पदार्पण करणारे खेळाडू आहेत. संघ निवडीबद्दल बोलताना मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, "पॅरिस ऑलिम्पिक संघाची निवड प्रक्रिया आमच्यासाठी किचकट होती, कारण आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. मला विश्वास आहे की निवडलेला प्रत्येक खेळाडू पॅरिसमध्ये त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करेल. निवडलेल्या प्रत्येक खेळाडूने तयारीच्या टप्प्यात असाधारण कौशल्य, समर्पण आणि लवचिकता दाखवली आहे.
ते पुढे म्हणाले, "या संघात अनुभवी खेळाडू आणि आशादायक युवा प्रतिभांचा परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे आम्हाला पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक अष्टपैलुत्व आणि ऊर्जा मिळते. आम्ही पॅरिसला जात असताना आमचे ध्येय स्पष्ट आहे. आम्ही जगातील सर्वोत्कृष्ट संघांना सामोरे जाण्यासाठी आणि सर्वोच्च व्यासपीठासाठी प्रयत्न करण्यास तयार आहोत. हे पथक संधीचे सोने करण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी सज्ज आहे. आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास आहे आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत."
भारताला गतविजेत्या बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यासोबत गट ब मध्ये ठेवण्यात आले आहे. पूल अ मध्ये नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका आणि यजमान फ्रान्स यांचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी, संघाने त्यांच्या पूलमध्ये अव्वल चार स्थान मिळवणे आवश्यक आहे.
भारतीय संघ
- गोलरक्षक: श्रीजेश पीआर
- बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय
- मिडफिल्डर: राजकुमार पाल, समशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद,
- फॉरवर्ड: अभिषेक, सुखजीत सिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग
- राखीव खेळाडू: नीलकांत शर्मा, जुगराज सिंग, कृष्ण पाठक