भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली. या विजयासह भारतीय संघाने राऊंड रॉबीनमध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. कर्णधार हरमनप्रीत सिंग ( 7 मिनिट), शमशेर सिंग (18 मि.), निलकांता शर्मा ( 22 मि.), गुरसाहीबजीत सिंग ( 26 मि.) आणि मनदीप सिंग ( 27 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. राऊंड रॉबीनमध्ये न्यूझीलंडने 2-1 अशा फरकाने भारताला पराभूत केले होते.
''आम्ही दमदार खेळ केला. सामन्यात मिळालेल्या संधीवर गोल करण्यात आम्ही यशस्वी ठरलो,''असे मत हरमनप्रीतने व्यक्त केले. तो म्हणाला,''अंतिम सामना हा आव्हानात्मकच असतो. राऊंड रॉबीनमध्ये आम्ही न्यूझीलंडकडून हरलो होतो. मात्र, त्या सामन्यातील चुकांवर आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि त्याचे फळ मिळाले.''
दोन्ही संघांना मैदानाच्या मध्यरेषेवरच अधिक खेळ करण्यावर भर दिला. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल करण्यात अपयशी ठरले. मात्र, कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने सामन्यावरील पकड मजबूत केली. न्यूझीलंडकडून पलटवार झाला, परंतु भारताची बचावफळीही तितकीच तगडी होती.