माद्रिद : कर्णधार राणी रामपाल व डिफेंडर गुरजित कौर यांनी केलेल्या प्रत्येकी २ गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने स्पेनचा चौथ्या सामन्यात ४-१ गोलने धुव्वा उडवला. यासह भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.मालिकेच्या शेवटच्या लढतीत भारताने आक्रमक व नियोजनपूर्वक खेळ करून स्पेनविरुद्ध सुरुवातीपासून वर्चस्व राखले. कर्णधार राणी रामपालने सामन्याच्या ३३ व ३७व्या दोन गोल केले. गुरजित कौरने ४४ व ५०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल करून आपल्या संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ५८व्या मिनिटाला स्पेनच्या लोला रिएराने आपल्या संघाचा एकमेव गोल केला.सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आघाडीची खेळाडू वंदना कटारियाने उत्कृष्ट ड्रिबलिंग करून स्पेनच्या गोलच्या दिशेने चेंडू नेऊन गोलच्या दिशेने मारला; पण स्पेनची गोलरक्षक मारिया रुईजने वंदनाचे आक्रमण परतवून लावले. भारतीयांना पहिल्या ५ मिनिटांत २ पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण गोल करण्यात यश आले नाही. तिसºया क्वार्टरमध्ये मिडफिल्डर नमिता तोप्पोने ३३व्या मिनिटाला स्पेनच्या सर्कलमध्ये राणी रामपालला पास दिला. राणीने कोणतीही चूक न करता संघाचा पहिला गोल केला. त्यांनतर लगेचच ४ मिनिटांनी राणीने पुन्हा गोल करत भारताची आघाडी भक्कम केली. ४४व्या मिनिटाला भारतीय महिलांनी रचलेल्या चालीत चेंडू स्पेनच्या खेळाडूकडून गोलच्या जवळून बाहेर गेला त्या वेळी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या पेनल्टी कॉर्नरचा पूर्ण फायदा घेत गुरजितने भारताचा तिसरा गोल केला.चौथ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवेळी गुरजितने कोणतीही चूक न करता गोल केला. सामना संपण्यास काही मिनिटे असताना स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळी त्यांच्या लोला रिएराने स्पेनचा सामन्यातील एकमेव गोल केला. (वृत्तसंस्था)
भारतीय महिलांनी साधली बरोबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 3:34 AM