मारलो : नवज्योत कौर व गुरजीत कौर यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने इंग्लंड दौऱ्यावर आपल्या अखेरच्या लढतीत ब्रिटनला २-२ ने बरोबरीत रोखले.भारतातर्फे नवज्योत (८ वा मिनिट) आणि गुरजीत (४८) यांनी गोल नोंदवले . ब्रिटनतर्फे एलिझाबेथ नील (५५) आणि अन्ना टोमान (६०) यांनी गोल केले. त्याचसोबत भारतीय संघाने दौ-याचा शेवट ब्रिटनसारख्या मजबूत संघाला बरोबरीत रोखत केला. भारताने पाच सामन्यांपैकी एक सामना जिंकला, एक गमावला आणि तीन सामने अनिर्णीत राखले.गेल्या लढतीत पराभूत झालेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली आणि यजमान संघाच्या हाफमध्येच खेळ झाला. आठव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नवज्योतने गोल करीत भारताचे खाते उघडले. दुसºया क्वॉर्टरमध्ये उभय संघांदरम्यान तुल्यबळ लढत झाली. ब्रिटनला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय गोलकिपर सविताने यावर उत्कृष्ट बचाव केला. तिसºया क्वॉर्टरमध्ये भारताने चेंडूवर नियंत्रण कायम राखले.मध्यंतरानंतर हीशच्या स्थानी अलेल्याा एमी टिनेंटने ४० व्या मिनिटाला गुरजीतचा फटका अप्रतिमपणे अडवला. भारताने ४८ व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. ब्रिटनने अखेरच्या पाच मिनिटांमध्ये दोन गोल करीत भारताच्या विजय मिळवण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. सामन्यात जबरदस्त बचावाचे प्रदर्शन केलेल्या भारतीय गोलकिपर सविताचा हा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यावेळी तिच्या या यशाचा आनंदही साजरा करण्यात आला. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला हॉकी संघाने ब्रिटनला बरोबरीत रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 4:31 AM