काकामिगहरा (जपान) - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत चीनवर शूटआऊटमध्ये 5-4 अशी मात करत भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. निर्धारीत वेळेत लढत 1-1 अशा बरोबरीत राहिल्यानंतर शूटआउटमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत भारतीय महिलांनी विजयश्री खेचून आणली. भारतीय महिला संघाचे आशिया चषक स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. या विजेतेपदाबरोबरच या स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघ 2018 साली होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. 25 व्या मिनिटाला नवज्योत कौर हिने केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय महिलांनी 47 व्या मिनटापर्यंत टिकवली. पण 47 व्या मिनिटाला टियांटन लुका हिने गोल करत चीनला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्धारीत वेळेत बरोबरी कायम राहिल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाने 5-4 अशी बाजी मारली.
भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यात विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्यफेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. भारतीय संघाने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०, चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते. गेल्या वेळी २०१३ मध्ये क्वालालंपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत तिस-या स्थानी होता. भारताने आतापर्यंत २००४ मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.