एंटवर्प : शानदार खेळाचे प्रदर्शन केलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने पिछाडीवरून पुनरागमन करताना बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाला २-२ गोलबरोबरीत रोखले. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय महिला दोन वेळा पिछाडीवर पडल्या होत्या.यजमान बेल्जियमकडून स्टॅन ब्रानिस्की (१९ वे मिनिट) आणि मॅथ्यू डि लीट (४३) यांनी गोल केले. तसेच, भारताकडून निक्की प्रधान (३६) आणि वंदना कटारिया (५४) यांनी महत्त्वपूर्ण गोल करीत सामना बरोबरीत रोखला.कर्णधार राणीच्या नेतृत्वात खेळणा-या भारतीय संघाने सावध परंतु सकारात्मक सुरुवात केली. ४०व्या सेकंदालाच पेनल्टी कॉर्नर मिळवताना भारतीय महिलांनी गोल करण्याची सुवर्णसंधी मिळवली. परंतु, बेल्जियमचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. यानंतर दोन मिनिटांनी बेल्जियमच्या गोलरक्षकाने आणखी एक पेनल्टी कॉर्नर वाचवताना भक्कम बचावाचे प्रदर्शन केले.यानंतर बेल्जियमने तुफान आक्रमण करताना सहा मिनिटांमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु, गोलरक्षक सविताने जबरदस्त प्रदर्शन करताना यजमानांना आघाडी घेण्यापासून रोखले. दुस-या क्वार्टरमध्ये बेल्जियमने चेंडूवर जास्त नियंत्रण राखले आणी १९व्या मिनिटाला ब्रानिस्कीने केलेल्या गोलच्या जोरावर त्यांनी आघाडी घेतली. दुस-या क्वार्टरपर्यंत बेल्जियमने आघाडी कायम राखली.तिसºया क्वार्टरमध्ये आक्रमक सुरुवात केलेल्या भारतीय महिलांनी ३६व्या मिनिटाला बरोबरीसाधली. निक्कीने शानदार गोल करताना भारताला महत्त्वपूर्णबरोबरी साधून दिली. या क्वार्टरमध्ये भारतीय महिलांनी चांगले नियंत्रण राखले. नेहा गोयलने यजमानांच्या क्षेत्रात मुसंडी मारताना गोल करण्याची संधी निर्माण केली, परंतु यात तिला यश आले नाही. यानंतर अखेरच्या मिनिटाला बेल्जियमने मॅथ्यू डि लीटने केलेल्या गोलच्या जोरावर ४३व्या मिनिटाला २-१ अशी आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)चौथ्या व अंतिम क्वार्टरमध्ये बेल्जियमने आक्रमक खेळ करत भारतीय महिलांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताची गोलरक्षक रजनी इतिमारपू हिने भक्कम बचाव करत बेल्जियमला आणखी यश मिळू दिले नाही. सामन्याच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. वंदानाने या वेळी यजमानांविरुद्ध हल्ला करताना ५४ व्या मिनिटाला निर्णायक गोल करून सामना २-२ अशा बरोबरीत आणला.
भारतीय महिलांचा शानदार खेळ, बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष संघाला २-२ गोलबरोबरीत रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:58 AM