टोकियो : भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने शनिवारी येथे सुरू झालेल्या आॅलिम्पिक चाचणी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजय मिळवत डबल धमाका केला. पुरुष संघाने मलेशियावर तर महिला संघाने जपानवर मात केली.मनदीपसिंग व गुरसाहिबजित सिंग यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाचा ६-० ने धुव्वा उडवला. गुुरिंदर सिंग व एस.व्ही. सुनील यांनीही प्रत्येकी एक गोल नोंदवला.भारताने पहिल्या क्वॉर्टरमध्ये वर्चस्व गाजवले. भारताला आठव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर गुरिंदरने गोल नोंदवला. १८ व्या मिनिटाला गुरसाहिबजितने भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मलेशियानेही एक-दोन चांगल्या चाली रचल्या, पण भारतीय गोलकिपर सूरज करकेराने उत्कृष्ट बचाव केला. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये भारतीय संघाने आक्रमक खेळ केला आणि १५ मिनिटामध्ये तीन गोल नोंदवले. भारताला रविवारी न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.भारतीय महिला हॉकी संघाने यजमान जपानवर २-१ ने शानदार विजय नोंदविला. पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ गुरजित कौर हिने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली.१६ व्या मिनिटाला अकी मित्सुहासी हिने गोल करत बरोबरी साधलीगुरजित कौर हिने पुन्हा एकदा ३५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघ आॅलिम्पिकच्या निर्देशानुसार १६ खेळाडूंसह खेळले. जपानला बदली खेळाडूचा लाभ झाला. २९ वर्षांच्या मित्सुहासी हिने संघाला बरोबरी साधून दिली.गेल्या दोन वर्षांत अनेकदा परस्परांविरुद्ध खेळल्यामुळे उभय संघ एकमेकांचे डावपेच समजून घेत होते. भारतीय संघाने मात्र अधिक हल्ले चढविले. मध्यांतरापर्यंत १-१ अशी बरोबरी होती. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने वर्चस्व गाजविले. ३५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजितने चेंडू अलगद गोलजाळीत ढकलला. तिचा गोल निर्णायक ठरला.
भारताचा हॉकीत ‘डबल धमाका’; पुरुषांची मलेशियावर, महिलांची जपानवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 1:29 AM