भुवनेश्वर : अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाचा भक्कम बचाव भेदण्यात आलेल्या अपयशामुळे विश्व हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान भारताला ०-१ असा पराभव पत्करावा लागला. यासह थोडक्यात अंतिम फेरीची संधी हुकलेल्या भारतीय संघाला आता कांस्य पदकासाठी सज्ज रहावे लागेल.येथील कलिंगा स्टेडियममध्ये भरपावसात झालेल्या या सामन्यात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला जबरदस्त झुंज दिली. भारतीय खेळाडूंना सामन्यात गोल करण्यात नक्कीच अपयश आले, मात्र आपल्या झुंजार खेळाच्या जोरावर त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. गोलरक्षक आकाश चिकटे याने पुन्हा एकदा भक्कम बचाव करताना अर्जेंटिनाची अनेक आक्रमणे अपयशी ठरवली. त्याचवेळी, पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेल्या अपयशाचा मोठा फटका बसल्याने भारतीयांची अंतिम फेरी थोडक्यात हुकली.१७व्या मिनिटाला गोन्झालो पेइल्लाट याने केलेला अप्रतिम गोल सामन्यातील निर्णायक गोल ठरला. या गोलच्या जोरावर मिळवलेली आघाडी अर्जेंटिनाने अखेरपर्यंत कायम राखत यजमानांना पराभवाचा धक्का दिला. गोल केल्यानंतरच्या उर्वरीत खेळामध्ये अर्जेंटिनाने कोणताही अतिरिक्त धोका न पत्करताना भारताच्या आक्रमकांना रोखत अंतिम फेरीत प्रवेश केला.विशेष म्हणजे, आतापर्यंत दोन्ही संघांना या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यात यश आलेले नाही. याआधी २०१४-१५ मध्ये रायपूर येथे झालेल्या स्पर्धेत भारताने बलाढ्य नेदरलँड्सला पेनल्टीशूटआऊटमध्ये ३-२ असे नमवत कांस्य पटकावले होते. दुसरीकडे, अर्जेंटिनालाही आतापर्यंत रौप्य किंवा कांस्य पदकावरसमाधान मानावे लागले आहे. मात्र, यंदा त्यांना सुवर्ण मिळवण्याची संधी असेल.(वृत्तसंस्था)नेदरलँड्सने दिला इंग्लंडला धक्कायुरोपियन चॅम्पियन नेदरलँड्सने सातव्या-आठव्या स्थानासाठी इंग्लंडचा १-० ने पराभव केला. सामन्यातील ४२ व्या मिनिटाला मिर्को प्रूइजेर याने केलेला गोल निर्णायक ठरला. उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंड अर्जेंटिनाकडून, तर नेदरलँड्स जर्मनीकडून पराभूत झाले होते. सुरुवातीच्या दोन्ही क्वार्टरमध्ये बचावात्मक खेळ झाला. तिसºया क्वार्टरमध्ये मिळविलेली आघाडी नेदरलॅन्डने अखेरपर्यंत टिकविली.
भारताचे अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस, उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाकडून ०-१ असा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:38 AM