नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मिडफिल्डर मनप्रीतसिंग याची निवड करण्यात आली. अनेक दिग्गज खेळाडू जखमांनी त्रस्त असल्यामुळे १८ सदस्यांच्या संघात युवा चेहऱ्यांना स्थान मिळाले. बचावफळीतील सुरेंदरकुमार हा उपकर्णधार असेल. स्पर्धेचे आयोजन इपोह येथे २३ ते ३० मार्च या कालावधीत होणार असून भारतासह यजमान मलेशिया, कॅनडा, कोरिया, द.आफ्रिका व आशियाई सुवर्ण विजेता जपान स्पर्धेत सहभागी होईल.भारताची सलामी २३ मार्चला जपानविरुद्धच होईल. आक्रमक फळीतील एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, ललित उपाध्याय, बचाव फळीतील रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व मधल्या फळीतील चिंगलेनसना सिंग हे सर्व दुखापतग्रस्त आहेत. याशिवाय विशाल अंतिल तसेच प्रदीपसिंग हे दोन्ही ज्युनियरही जखमी आहेत. हॉकी इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सर्व जखमी खेळाडू बेंगळुरु येथील साई केंद्रात ‘रिहॅबिलिटेशन’ प्रक्रियेत सहभागी होतील. १८ सदस्यांच्या संघात अनुभवी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश व दुसरा गोलरक्षक कृष्ण पाठक याचा समावेश आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर हकालपट्टी करण्यात आलेले हरेंद्र सिंग यांच्यानंतर प्रशिक्षकपद रिक्त आहे. (वृत्तसंस्था)>भारतीय हॉकी संघ :गोलकीपर : पी. आर. श्रीजेश, कृष्ण बी पाठक. बचाव फळी : गुरिंदर सिंग, सुरेंदर कुमार (उपकर्णधार), वरुण कुमार, वीरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास, कोथाजीतसिंग. मधली फळी : हार्दिक सिंग,नीलकांत शर्मा, सुमित, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग (कर्णधार) आक्रमक फळी : मनदीप सिंग, सिमरनजीत सिंग, गुरजंत सिंग , शिलानंद लाक्रा आणि सुमित कुमारप्रमुख खेळाडू दुखापतींमुळे स्पर्धेत खेळणार नाहीत, हे दुर्दैवी आहे. हे खेळाडू एफआयएच सिरीजच्या फायनलमध्ये खेळतील. आॅलिम्पिक पात्रतेसाठी या खेळाडूंची गरज आहे.’’- डेव्हिड जॉन, हाय परफॉर्मन्स संचालक.
अझलन शाह चषकासाठी मनप्रीत सिंगकडे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:13 AM