नवी दिल्ली : दीर्घकाळापासून हाॅकी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एलेना नाॅर्मन यांनी तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय महासंघाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
मूळच्या ऑस्ट्रेलियाच्या असलेल्या नाॅर्मन १३ वर्षांपासून या पदावर आहेत. मागील तीन महिन्यांपासून त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. भारतीय महिला हाॅकी संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षक यानेक शाॅपमन यांनी तीन दिवसांपूर्वीच हाॅकी इंडियाकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच नाॅर्मन यांनीही पद सोडले आहे.
हॉकी इंडियासोबत काम करणे कठीण : नाॅर्मननाॅर्मन म्हणाल्या की, राष्ट्रीय महासंघात एकमेकांवर सुरू असलेल्या कुरघोडीच्या वातावरणात काम करणे कठीण झाले होते. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. दोन गटांच्या वादात काम करणे कठीण आहे. हाॅकी इंडियात दोन गट आहेत. एकात मी आणि दिलीप तिर्की, तर दुसऱ्या गटात सचिव भोलानाथ सिंह, आर. के. श्रीवास्तव आणि शेखर जे मनोहरन हे आहेत. काही लोकांना सत्ता मिळवायची आहे, तर दिलीप यांना सुधारणा करायची आहे. पद सोडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.