बंगळुरू : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे संघाला विश्वचषकाआधी स्वत:ला पारखण्याची संधी मिळेल, असे सांगितले. भारताचा १८ सदस्यीय संघ या स्पर्धेसाठी आज रात्री नेदरलँडच्या ब्रेडा येथे रवाना होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २३ जून ते एक जुलैदरम्यान खेळवली जाणार आहे.भारत आणि नेदरलँडशिवाय या स्पर्धेत अर्जेंटिना, पाकिस्तान, बेल्जियम आणि विद्यमान चॅम्पियन आॅस्ट्रेलियाचा संघ सहभागी होत आहे. ही स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस भुवनेश्वर येथे होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतासाठी कठोर परीक्षाच असेल.श्रीजेशने म्हटले, ‘सध्या आमचे लक्ष्य स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यावर आहे; परंतु विश्वचषकाआधी आम्ही अन्य संघाच्या तुलनेत कोणत्या स्थितीत आहे हे पारखण्याची चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे आम्हाला संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीत संस्मरणीय कामगिरी करू, याचा आम्हाला विश्वास आहे. एकापाठोपाठ एक सामने होणार आहेत आणि ही आव्हानात्मक स्पर्धा असेल.’ (वृत्तसंस्था)
चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे स्वत:ला पारखण्याची संधी - श्रीजेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:00 AM