नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचा या वर्षाचा कार्यक्रम व्यस्त असला तरी पुरुष संघाचे प्रशिक्षक सोर्ड मारिन यांचे लक्ष्य आशियाई खेळांमध्ये विजेतेपद कायम राखण्याकडे आहे. त्यामुळे खेळाडूंना २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळेल.भारताला या वर्षात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई क्रीडा आणि सत्राच्या अखेरीस एफआयएच पुरुष विश्व चषकासोबतच अझलन शाह कप या महत्त्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. मात्र आशियाई स्पर्धा व विश्वचषक जिंकणे हा संघाचा मुख्य अजेंडा आहे.मारिन म्हणाले की, ‘संघाने आशियाई स्पर्धा व विश्वचषक जिंकावा, असे मला वाटते. जर तुम्ही आशियाई स्पर्धा जिंकाल तर २०२० च्या आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारा पहिला संघ बनू शकता. त्यामुळे आॅलिम्पिक तयारीसाठी दोन वर्षे असतील. हेच आमचे लक्ष्य आहे. मारिन पुढे म्हणाले, ‘या वर्षी प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीकडे आम्ही आशियाई खेळांच्या तयारीच्या दृष्टीने पाहत आहोत.’ओडिसा राज्य प्रायोजक- ओडिसा राज्य सरकाराने भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाचे पाच वर्षांसाठी प्रायोजकत्व घेतले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच प्रायोजक म्हणून एखाद्या राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.- ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एका सोहळ्यात ही घोषणा केली. यावेळी भारताचे पुरुष व महिला राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, आयओए सचिव राजीव मेहता आणि धनराज पिल्ले, दिलीप तिर्की व वीरेन रिस्किन्हा या माजी कर्णधारांचीही उपस्थिती होती. यावेळी पटनायक यांनी संघाच्या जर्सीचे अनावरण केले.
‘आमचे लक्ष आशियाई, विश्वचषक’, खेळाडूंना कियो आॅलिम्पिकच्या तयारीसाठी मिळेल जास्त वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:14 AM