नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून दैनिक भत्त्याविना खेळत असलेल्या पाकिस्तान पुरुष हॉकी संघाने थकबाकीची रक्कम मिळेपर्यंत आगामी आशियाडमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे पाक हॉकी महासंघाने मात्र इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार या संकटावर तोडगा काढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.पाक खेळाडूंना गेल्या सहा महिन्यांपासून दैनिक भत्ता मिळालेला नाही. अशा स्थितीतही खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी मोठी स्पर्धा खेळली. प्रत्येकी खेळाडूची ८० लाख इतकी थकबाकी आहे. यासंदर्भात कर्णधार मोहम्मद रिझवान (सिनियर)कराची येथून वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, ‘आशियाडपूर्वी थकबाकी न मिळाल्यास आम्ही खेळणार नाही, असे ठरले आहे. संघ १२ आॅगस्ट रोजी रवाना होणार असून, आम्ही १० आॅगस्टपर्यंत प्रतीक्षा करू.’इंडोनेशिया येथे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आशियाडचे आयोजन होणार आहे.आठ वेळा चॅम्पियन...पाकिस्तान संघाने आतापर्यंत चार विश्वचषक आणि तीन आॅलिम्पिक जेतेपद मिळविले आहेत. १९९४ साली अखेरचा विश्वचषक तसेच १९८४ ला अखेरचे आॅलिम्पिक सुवर्ण जिंकले होते. आशियाडचे आठवेळा सुवर्ण जिंकणाऱ्या पाकने २०१० मध्ये अखेरचे सुवर्ण जिंकले होते, हे विशेष.
पाक हॉकी संघाचा आशियाडवर बहिष्कार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 4:22 AM