लुसाने : भारतीय पुरुष हॉकी संघ जानेवारीमध्ये सुरु झालेल्या पहिल्या एफआयएच प्रो-लीगमधून बाहेर पडल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या लीगमध्ये सहभागी होणार आहे. लीगमध्ये भारताच्या पुनरागमनाचे समर्थन करताना आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) म्हटले की, या निर्णयाला अन्य प्रतिस्पर्धी देशांचा पाठिंबा आहे.एफाआयएचने आपल्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीनंतर म्हटले की,‘भारतीय पुरुष संघ २०२० मध्ये एफआयएच प्रो-लीगसोबत जुळेल. याचे अन्य प्रतिस्पर्धी राष्ट्रीय संघांनी सर्वानुमते समर्थन केले आहे.’ जुलै २०१७ मध्ये हॉकी इंडियाने पुरुष व महिला दोन्ही राष्ट्रीय संघांना स्पर्धेतून हटविण्याचा निर्णय घेतला होता. हॉकी इंडियाने यासाठी कुठले कारण दिले नव्हते, पण महिला संघाच्या खराब क्रमवारीमुळे भारताला दोन्ही स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याची चर्चा होती.‘हॉकी विश्व लीगच्या माध्यमातून संघाकडे आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची चांगली संधी राहील,’ असे हॉकी इंडियाचे मत आहे. एफआयएचचे सीईओ थियेरी वील म्हणाले,‘पुढील वर्षी भारत एफआयएच प्रो-लीगसोबत जुळेल ही चांगली बाब आहे. देशात हॉकीबाबत पॅशन असून त्यामुळे आमच्या नव्या स्पर्धेला बराच लाभ होईल.’दरवर्षी रंगणार एफआयएच प्रो लीगकार्यकारी बोर्डाने त्याचसोबत २०२० व २०२१ एफआयएच प्रो-लीगच्या सामन्यांना अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. लीगचे आयोजन दरवर्षी पहिल्या ६ महिन्यांत करण्यात येणार असून सर्व सामने मायदेशात होतील. प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावरील सामने होतील, पण ते दोन सत्रात खेळले जातील. उदाहरण द्यायचे झाल्यास २०२० मध्ये ‘अ’ संघ काही दिवसांमध्ये दोन वेळा ‘ब’ संघाचे यजमानपद भूषवले तर २०२१ मध्ये ‘ब’ संघ काही दिवसाच्या अंतरात दोनदा ‘अ’ संघाचे यजमानपद भूषवले.
भारतीय पुरुष हॉकी संघ खेळणार प्रो-लीग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:16 AM