नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेत आधीच स्थान निश्चित केले असले, तरी आशिया चषक स्पर्धा जिंकून दमदारपणे विश्वकप हॉकी स्पर्धेत खेळू, असा विश्वास भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केला आहे.जपानच्या काकामिगहरा शहरात सुरू असलेल्या आशिया चषकात भारताने साखळीत तिन्ही सामने जिंकले. उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ कझाकिस्तानशी पडेल. प्रतिस्पर्धी संघाने तिन्ही साखळी सामने गमाविले हे विशेष. द. आफ्रिकेने आफ्रिकन नेशन्स कपमध्ये घानावर ४-० ने विजय नोंदविताच भारताने विश्वचषकाची पात्रता मिळविली होती. पण, राणीने मात्र भारतीय संघ विश्वचषकात स्वत:च्या बळावर स्थान मिळवेल, असे म्हटले आहे.राणी म्हणाली, ‘‘पात्रता गाठली ही समाधानाची बाब आहे; पण आशिया चषक जिंकून विश्वकप खेळायचा, असा आमचा निर्धार असेल. कुणाच्याही सहानुभूतीच्या बळावर पुढे जाणे आपल्याला पसंत नाही. यासाठी कठोर मेहनत घेत आहोत.’’ गटातील सामन्यात भारताने सिंगापूरचा १०-०ने, चीनचा ४-१ने आणि मलेशियाचा २-०ने पराभव केला होता. राणी म्हणाली, ‘‘आमची कामगिरी चांगली झाली; पण यापुढील खेळावर फोकस करणार आहोत. प्रत्येक संघ विजयासाठीच खेळत असल्याने प्रतिस्पर्धी सोपा नाही, या भावनेतून वाटचाल करू.’’मागच्या वर्षी लखनौ येथे ज्युनियर विश्वचषक हॉकीचे जेतेपद पटकाविणाºया भारतीय संघाचे कोच हरेंद्रसिंग यांची महिला संघासोबत ही पहिलीच स्पर्धा आहे. हरेंद्र यांनी संघाला चॅम्पियनच्या थाटात वावरण्याचे बळ दिले असून त्यांच्यामुळे सकारात्मकता आल्याचे राणीने सांगितले. हरेंद्र बेसिक्सवर लक्ष देत असल्याने आत्मविश्वास उंचावत आहे. (वृत्तसंस्था)विजयी लय कायम राहीलयुवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेल्या भारतीय महिला संघाचे भविष्य उज्ज्वल आहे, रोटेशन पद्धतीने आम्ही युवा खेळाडूंना संधी देतो. अनुभवी खेळाडू स्वत:ची जबाबदारी ओळखून खेळत असल्याने पुढेही विजयी लय कायम राहील, असा विश्वास राणीने व्यक्त केला.
आशिया चषक स्पर्धा जिंकून दमदारपणे विश्वकप हॉकी स्पर्धेत खेळू - राणी रामपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:39 AM