- स्वदेश घाणेकरमेजर ध्यानचंद यांच्या जादुई खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नाही हे आमच्या पिढीचे दुर्दैव... ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदकं जिंकून दिली.. ज्याच्या क्रुरतेला जग घाबरत होते, तो हिटलरही त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडला... ध्यानचंद यांच्या मनगटात जादू होती, हॉकी स्टीक आणि चेंडू यांच्यातील ताळमेळ त्यांच्यासारखे कोणीच साधू शकत नाही.. म्हणून ते भारताच्या हॉकी इतिहासातील एक महान खेळाडू होते... आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल हेच ऐकून हॉकीच्या प्रेमात पडावेसे वाटले...
आज त्यांचा 113 वा जन्मदिवस आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस... त्यांच्या कर्तृत्त्वाचा उजाळा देण्याचा 29 ऑगस्ट हा हक्काचा दिवस. आजचा दिवस वगळता वर्षातील उर्वरीत दिवसांत त्यांचे कर्तृत्व सोडाच, तर त्यांची आठवण होत होत नाही. त्यांना भारतरत्न द्या, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलुन ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करा, अमुक अमुक मागण्या होतात त्या केवळ आजच्या दिवशीच, 30 ऑगस्टच्या सूर्योदयाबरोबर त्या मावळतातही. मग प्रश्न पडतो हे एका दिवसाचे सोंग कशाला?
ज्या ध्यानचंद यांचा महिमा सांगताना शब्द अपुरे पडतात, त्यांच्या स्तुतींची माळ ओवताना शब्दकोशातील फुलेही कमी पडतात. त्यांना अखेरच्या काळात उपचारासाठी झगडावे लागले. हे कटु सत्य आहे. तीन-चार वर्षांपूर्वी ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांच्या भेटीचा योग आला. खूप काही बोलायचे होते, खुप काही एकायचे होते, बरच काही जाणुन घ्यायचे होते. पण, फार कमी शब्दात अशोक कुमार यांनी मेजर ध्यानचंद यांची ओळख करून दिली. त्यांच्याशी बोलल्यानंतर नक्की कोणावर चिडावे, कोणाला दोष द्यावा हेच कळत नव्हते. मनाला लागलेही हुरहुर कोणाला सांगू शकतही नव्हतो. ध्यानचंद यांचा अपमानीत करण्यात इतरांप्रमाणे अप्रत्यक्षरित्या अपराधी होतो.
अतिशन नम्र, बोलण्यात जाणवणारा मायेचा ओलावा... ध्यानचंद यांच्याकडून अशोक कुमार यांना मिळालेला हा वारसाच होता. अशोक कुमार यांनी ध्यानचंद खेळाडू म्हणून किती महान होते, हे सांगण्याचा साधा प्रयत्नही केला नाही किंवा त्यांच्या बोलण्यातून आपण एका महान खेळाडूचे सुपुत्र आहोत, असा माजही नव्हता. त्याच्यावरूनच ध्यानचंद हे व्यक्ती म्हणूनही किती डाऊन टू अर्थ हे कळते. साधे रहाणीमान, अहंकाराचा 'अ' ही अंगाला न शिवलेल्या ध्यानचंद यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढतच होती. अशोक कुमार यांच्या बोलण्यातून ध्यानचंद यांचे बरेच पैलू उलगडले.
त्यातल्याच काही पैलूंनी मनाला चटके दिले. ध्यानचंद यांचा गोडवा गाणाऱ्यांना महान हॉकीपटूच्या अखेरच्या काळात विसर पडला. ज्या हॉकी स्टीकच्या करिष्म्यावर ध्यानचंद यांनी सुवर्णपदक जिंकली ती स्टीक्स चोरीला गेली. विशेषतः त्याची दखलही घेणे कोणाला महत्त्वाचे वाटले नाही. यापेक्षा विदारक परिस्थिती तेव्हा उद्भवली, जेव्हा आयुष्याच्या अखेरच्या क्षणाला त्यांच्याकडे उपजिवीकेसाठी पैसे नव्हते. देशाचा नायक नागरिकांच्या स्मृतीतून नाहीसा झाला होता. अहमदाबादला एका हॉकी स्पर्धेला त्यांना तर कोणी ओळखलेच नाही. कर्करोगाशी झगडत त्यांचा मृत्यु झाला. उपचारासाठीही त्यांना मदतीचे हात फार उशीरा मिळाले. नवी दिल्लीतल्या मोठ्या हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डात त्यांना उपचार घ्यावे लागले.
ही वस्तुस्थिती सांगताना अशोक कुमार यांच्या मनात कोणाबद्दल द्वेष नव्हता. जे घडले ते असे होते, ते बदलू शकत नाही. पण, जे ध्यानचंद यांच्या वाट्याला आले, ते अन्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये, हे त्यांना सांगायचे होते. आनंद कुमार निघून गेले आणि माझ्या मनात मात्र एक अपराध्याची भावना निर्माण करून गेले. आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने अशोक कुमार यांच्या नजरेतून मला कळालेले ध्यानचंद पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले.