नवी दिल्ली : गेल्या नऊ वर्षांपासून नोकरी मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेली भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनियाला क्रीडामंत्र्यांकडून मिळालेले नोकरीचे आश्वासन आणि अर्जुन पुरस्कारासाठी तिच्या नावाची झालेली शिफारस यामुळे कारकीर्दीला संजीवनी मिळण्याची आशा आहे.२८ वर्षीय हरियाणाच्या या स्टार गोलकीपरच्या कुटुंबीयांनी कारकीर्दीमध्ये नेहमीच तिला साथ दिली. पण नोकरी नसणे आणि वाढत्या वयासोबत नातेवाईकांमध्ये विवाहाबाबत कानगोष्टी सुरू झाल्या होत्या. अर्जुन पुरस्कारासाठी सविताच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यानंतर बोलताना सविता म्हणाली,‘माझ्या कुटुंबीयांनी नेहमीच माझे मनोधैर्य वाढविले आहे. पण लोक मात्र वय वाढत असून विवाह व्हायला हवा, अशी चर्चा करतात. आता अर्जुन पुरस्कारानंतर चार-पाच वर्षे कुणी काही बोलणार नाही, असे मला वाटते.’क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी आशियाई गेम्समध्ये रौप्य पदक जिंकल्यावर संघासोबत परतल्यानंतर तिला वैयक्तिक रूपाने नोकरीचे आश्वासन दिले असल्याचे सविताने सांगितले. गेल्या १० वर्षांपासून भारतीय सिनिअर संघासोबत खेळत असलेली ही गोलकीपर म्हणाली, ‘आशियाई स्पर्धेमधून परतल्यावर राठोड सरांसोबत एका कार्यक्रमात भेटल्यानंतर त्यांनी मला नोकरीचे आश्वासन दिले. नऊ वर्षांची माझी प्रतीक्षा आता संपुष्टात येईल आणि पूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करता येईल, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)आॅलिम्पिक पदक पटकावण्याचा विश्वासआशियाई स्पर्धेनंतर भारतीय हॉकी संघाला एक महिन्याचा ब्रेक मिळाला. १ आॅक्टोबरपासून पुन्हा शिबिर प्रारंभ होईल. सविता म्हणाली, ‘आशियाडमध्ये आम्हाला सुवर्ण जिंकता आले नसले तरी रौप्य पदकामुळे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. सर्व खेळाडू सकारात्मक विचार करीत आहेत आणि टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवत आम्ही पदक पटकावण्यात यशस्वी ठरू, असा आम्हाला विश्वास आहे.’
हॉकीपटू सविताच्या कारकिर्दीला संजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:44 PM