नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघातील बचावपटू सुनीता लाक्रा हिने गुडघ्याच्या दुखापतीला कंटाळून आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा केली. सुनीता २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य विजेत्या भारतीय संघाची खेळाडू होती. दुखापतीमुळे दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करून घ्यावी लागल्याचे सुनीताने सांगितले.निवृत्तीची घोषणा केल्यामुळे २८ वर्षांच्या सुनीताचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता म्हणाली,‘आज माझ्यासाठी भावनिक क्षण असून मी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहे.’ सुनीता २००८ पासून भारतीय संघात आहे. यादरम्यान तिने संघाचे नेतृत्वदेखील केले. भारतासाठी १३९ सामने खेळलेली सुनीता २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य विजेत्या भारतीय संघाची खेळाडू होती. तीन दशकानंतर पहिल्यांदा पात्र ठरलेल्या भारतीय संघातून सुनीता रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. मात्र टोकियो ऑलिम्पिकचे तिचे स्वप्न गुडघेदुखीमुळे भंगले. सुनीता पुढे म्हणाली, ‘काही दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. यातून सावरण्यास किती वेळ लागेल, हे निश्चित नाही. शस्त्रक्रियेनंतर मात्र मी स्थानिक हॉकीत खेळणे सुरू ठेवणार आहे. मला नोकरी दिलेल्या संघासाठी मी नियमित खेळणार आहे.’ सुनीताने यावेळी सहकारी खेळाडू, हॉकी इंडिया आणि मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांचे आभार मानले आहेत. (वृत्तसंस्था)तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय संघातून खेळण्याचे भाग्य मला लाभले. मात्र आता गुडघादुखीमुळे पुढील ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले. आता आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने या दुखापतीतून कधीपर्यंत सावरेन याची कल्पना नाही.- सुनीता लाक्रा
आंतरराष्ट्रीय हॉकीतून सुनीता लाक्राची निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 2:02 AM