नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारताचा पुरुष हॉकी संघ पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सोमवारी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ६, ७, १०, १२ आणि १३ एप्रिल रोजी पाच सामने खेळणार आहे. भारताने अलीकडे भुवनेश्वर येथे एफआयएच प्रो लीग हॉकीत चारपैकी तीन सामने जिंकले होते.
रवाना होण्याआधी कर्णधार हरमन म्हणाला, ‘या दौऱ्याबाबत आम्ही फारच उत्साही आहोत. पॅरिस ऑलिम्पिकआधी या दौऱ्यातून बलस्थाने आणि कच्चे दुवे शोधता येतील. यातून सुधारणेस वाव असेल.’ उपकर्णधार हार्दिक सिंग म्हणाला, ‘आम्ही कौशल्य आणि रणनीती उंचाविण्यासाठी सांघिकदृष्ट्या कठोर मेहनत घेत आहोत. आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास असल्याने ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरीची अपेक्षा बाळगता येईल.’
भारतीय हॉकी संघ- गोलकीपर : किशन बहादूर पाठक, पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा. बचाव फळी : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, आमिर अली. मधली फळी : मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंग, निलाकांता शर्मा, राजकुमार पाल, विष्णुकांत सिंग. आक्रमक फळी : आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहील मौसीन, बॉबी सिंग धामी, अराइजीत सिंग हुंडल.