लुसाने : सदस्य देशांना उपमहाद्विपीय पात्रता व अजिंक्यपद स्पर्धेवर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने यंदाच्या स्पर्धेनंतर हॉकी सिरिज स्पर्धेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रो लीगचे पहिले पर्व यशस्वी ठरल्याचे स्पष्ट करीत एफआयएचने म्हटले की, ‘यंदाच्या वर्षानंतर हॉकी सिरिज स्पर्धेचे आयोजन होणार नाही. ही स्पर्धा विश्वकप व आॅलिम्पिक पात्रता स्पर्धाही असते. त्याऐवजी उपमहाद्विपीय पात्रता स्पर्धांवर अधिक भर राहील.’ हा निर्णय नरिंदर बत्रा यांच्या अध्यक्षतेखाली १५ व १६ मार्च रोजी एफआयएच कार्यकारी बोर्डाच्या वर्षातील पहिल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.एफआयएचने स्पष्ट केले की,‘एफआयएच सिरिज स्पर्धा २०१९ नंतर होणार नाही. विश्वकप पात्रता स्पर्धा प्रक्रियेचेही समीक्षण करण्यात येईल.’गेल्या वर्षी प्रारंभ झालेली हॉकी सिरिजमध्ये पुरुष व महिला प्रो-लीगमध्ये समावेश नसलेल्या सर्व संघांचा समावेश आहे. त्यात दोन फेरी ओपन व फायनल्स होतील. एफआयएच मानांकनातील अव्वल ९ संघ थेट फायनल्समध्ये खेळतील तर उर्वरित संघ ओपन राऊंडमध्ये खेळतील. फायनल्समध्ये एकूण २४ संघांचा समावेश राहील.कार्यकारी बोर्डाची यानंतरची बैठक २८-२९ जून रोजी अॅम्सटरडॅमला होईल. (वृत्तसंस्था)