भारतीय हॉकी विश्वातील दिग्गज खेळाडू बलबीर सिंग ( सीनियर) यांचे सोमवारी निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. मागील अनेक दिवस ते हॉस्पिटलमध्ये भरती होते. हृदयविकाराच्या झटका आल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत 1948, 1952 आणि 1956 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. भारताच्या सुवर्णयुगाचे ते साक्षीदार होते.
1952च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. भारतानं तो सामना 6-1 अशा फटकानं जिंकला होता आणि त्यात बलबीर सिंग यांनी पाच गोल केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे. 1957मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले गेले आणि या पुरस्कार पटकावणारे ते पहिले खेळाडू होते.
भारतीय संघात सेंटर-फॉरवर्ड म्हणून बलबीर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. स्वातंत्र्यानंतर तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चार खेळाडूंपैकी बलबीर हे होते. त्यांच्याशिवाय लेस्ली क्लाऊडीस, रणधीर सिंग जेंटल आणि रंगनाथन फ्रान्सिस यांनी तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकली आहेत. क्लाऊडी यांचं 2012मध्ये निधन झाले. त्यांनी 1960च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते.