इपोह (मलेशिया) : भारतीय पुरुष हॉकी संघ २७व्या अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरुवात उद्या (शनिवारी) जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिना संघाविरुद्ध करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजय नोंदविण्याच्या प्रयत्नात असणार आहे.सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत खेळताना भारतीय संघाला शुक्रवारी मित्रत्वाच्या सामन्यात विश्व क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-२ गोलने पराभव पत्करावा लागला आहे. संघाचा एकमेव गोल रमणदीप सिंगने केला होता. संघात अव्वल गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचे आगमन झाले आहे. या वेळी संघात आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, रुपिंदरपाल सिंग आणि हरमनप्रीत सिंगचा समावेश आहे.या दिग्गज खेळाडूंचा समावेश संघात असताना कर्णधार सरदार सिंग आणि मार्गदर्शक मारिन यांच्यापुढे संघात समावेश करण्यात आलेल्या युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अर्जेंटिनाविरुद्ध खेळताना भारतीय संघाचे मार्गदर्शक मारीन यांना योग्य रणनीती आखावी लागणार आहे. संघाची आघाडीची आणि मधली फळी जरी भक्कम असली तरी अर्जेंटिनाच्या आघाडी फळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्जेंटिना संघाच्या बचाव फळीचे खेळाडूसुद्धा चांगल्या तयारीचे आहेत. भुवनेश्वर येथे विश्व लीगच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ०-१ गोलने पराभव पत्करावा लागला होता. पण त्या वेळी भारतीय संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते.
भारत-अर्जेंटिना लढत आज, विजयाने अभियानाची सुरुवात करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 11:52 PM