टोकियो : भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रविवारी भारताने ग्रेट ब्रिटनचे कडवे आव्हान ३-१ असे परतावून लावत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. भारतीय हॉकी संघाची भिंत अशी ओळख असलेल्या गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हा भारताच्या दिमाखदार विजयाचा शिल्पकार ठरला. यावेळी भारताला एकही पेनल्टी कॉर्नर मिळवता आला नाही, मात्र ब्रिटनने आठ पेनल्टी कॉर्नर मिळवले. पण श्रीजेशचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.
वेगवान सुरुवात केलेल्या भारताने सुरुवातीपासून ब्रिटनवर दडपण आणले. पहिल्याच मिनिटाला ब्रिटनच्या गोल जाळ्यात आक्रमण करत भारताने गोल करण्याची संधी निर्माण केली होती. मात्र ब्रिटनने कसेबसे हे आक्रमण परतावले. यानंतर सातव्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. येथून मिळवलेली पकड आणखी घट्ट करताना भारताने लगेच दुसरा गोल केला. १६ व्या मिनिटाला गुरजंत सिंगने गोल करत भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारताने हीच आघाडी कायम राखली. परंतु, त्यानंतर ब्रिटनने जबरदस्त प्रत्युत्तर दिले. आक्रमक चाली आणि वेगवान खेळ करत ब्रिटनने एकामागून एक पेनल्टी कॉर्नर मिळवले. बहुतेकदा त्यांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, ४५ व्या मिनिटाला इयान वॉर्डने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ब्रिटनची पिछाडी कमी केली. यानंतरही ब्रिटनने पेनल्टी कॉर्नर मिळवले, मात्र श्रीजेश आणि बचावफळीचे संरक्षण भेदण्यात त्यांना यश आले नाही. त्यातच पुन्हा एकदा भारतीयांनी सामन्यावर पकड मिळवली. ५७ व्या मिनीटाला हार्दिक सिंगने ब्रिटनच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत भारताचा तिसरा गोल केला. या गोलसह जबरदस्त आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीयांनी नंतर ब्रिटनला पुनरागमनाची संधी दिली नाही.
आजच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा संघ सरस होता. त्यांनी चांगला खेळ केला. पण तरी भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. - गुरजंत सिंग
आता आव्हान विश्वविजेत्यांचे१९८० साली मॉस्को ऑलिम्पिकनंतर तब्बल ४१ वर्षांनी भारतीयांनी उपांत्य फेरी गाठली असून आता पुन्हा एकदा ऑलिम्पिक पदक पटकावण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. भारताला आता मंगळवारी उपांत्य फेरीत विश्वविजेत्या बेल्जियमच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे.१९७२ नंतर पहिल्यांदा गाठली उपांत्य फेरीभारताने १९८० साली हॉकीमध्ये अखेरचे ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले होते. मात्र त्यावेळी केवळ सहा संघांनीच सहभाग घेतला होता. राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या तेव्हाच्या स्पर्धेत आघाडीवरील पहिल्या दोन संघांमध्ये सुवर्ण पदकाची लढत झाली होती. त्यात भारताने बाजी मारली होती.१९८० सालच्या ऑलिम्पिकवर तुलनेने दुबळ्या संघांचा समावेश होता. कारण त्यावेळी अमेरिकेने स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. भारत, स्पेन, सोव्हिएत युनियन, पोलंड, क्युबा आणि टांझानिया या देशांचा सहभाग असलेली हॉकी स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात आली. यामध्ये भारताने अंतिम फेरीत स्पेनला नमवत सुवर्ण पटकावले होते. त्यामुळे १९७२ सालानंतर आता पहिल्यांदाच भारतीय संघ उपांत्य फेरीत खेळेल.
महत्त्वाचे :- ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.- सामन्यात भारताला एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही.- ब्रिटनने सामन्यात ८ पेनल्टी कॉर्नर मिळवले.- सामन्यात ब्रिटनने चेंडूवर ५९% वर्चस्व राखले.- तिसरा गोल स्वीकारल्यानंतर इंग्लंडने पूर्ण आक्रमण करण्याचा निर्णय घेत आपला गोलरक्षक हटवला.
महिला हॉकीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान
टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपुर्व फेरी गाठली आहे. मात्र यात ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर आहे. भारतीय महिला हॉकी संघाने आर्यलॅण्ड आणि दक्षीण आफ्रिकेवर सलग विजय मिळवत सहा गुणांसह पुल एमध्ये चौथ्या स्थानावर राहत पहिल्यांदाच अंतिम आठमध्ये जागा बनवली. या आधी भारतीय महिला हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील सर्वश्रेष्ट प्रदर्शन १९८०मध्ये होते.
राणीच्या नेतृत्वात भारताच्या आघाडीच्या फळीने चांगला खेळ केला आहे. मात्र शर्मिला देवी, लालरेमसियामी आणि स्वत: राणी हीने अनेक संधी गमावल्या. तसेच पेनल्टी कॉर्नरवर भारताची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरने निराश केले आहे. संघाने पाच साखळी सामन्यात ३३ पेनल्टी कॉर्नर मिळवले मात्र त्यातील चार संधींवरच गोल करता आला. सोमवारी भारताला जर उपांत्य फेरीत पोहचायचे असेल तर गुरजीतला चांगला खेळ करावा लागणार आहे. रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया दहाव्या क्रमांकावरील भारतीय संघाच्या विरोधात प्रबळ दावेदार म्हणून खेळेल.