टोकियो : पदकाच्या आशा उंचावलेला भारतीयहॉकी पुरुष संघ मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध भिडेल. त्याचबरोबर या सामन्यात बाजी मारत गेल्या ४१ वर्षांत पहिले ऑलिम्पिक पदक पटकावण्याचे लक्ष्यही भारतीयांनी बाळगले आहे.ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघाच्या नावावर विश्वविक्रमी आठ सुवर्णपदकांची नोंद आहे. मात्र, १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेले सुवर्ण पदक भारताचे अखेरचे ऑलिम्पिक पदक ठरले. त्यानंतर भारतीय हॉकी संघाला एकही ऑलिम्पिक पदक पटकावता आलेले नाही. आता मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वात भारतीय हॉकीचा सुवर्ण काळ पुन्हा आणण्याचा चंग भारतीय संघाने बांधला आहे. १९७२ साली म्युनिख ऑलिम्पिकमध्ये भारताने आपला अखेरचा उपांत्य सामना खेळला होता. त्यावेळी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध भारताचा ०-२ असा पराभव झाला होता.मंगळवारी बेल्जियमला नमवल्यास भारतासाठी हे सर्वात मोठे यश ठरेल. यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्याच साखळी सामन्यात भारतीयांना ऑस्ट्रेलियाविरूद्ध १-७ असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यानंतर फिनिक्स भरारी घेतलेल्या भारतीयांनी सलग चार सामने जिंकले.
- बेल्जियम संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, ते विद्यमान विश्वविजेते आणि युरोपीयन चॅम्पियन असून, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानीही आहेत.तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताने गेल्या काही सामन्यांत बेल्जियमवर चांगलेच वर्चस्वही गाजवले आहे. २०१९ सालच्या बेल्जियम दौऱ्यात भारताने यजमानांविरूद्ध मालिकेतील तिन्ही सामने जिंकले होते. - त्या दौऱ्यात भारताने बेल्जियमला २-०, ३-१ आणि ५-१ असे नमवले होते. शिवाय यंदा मार्चमध्ये भारताच्या युरोपियन दौऱ्यातही झालेल्या सामन्यात भारताने बेल्जियमला ३-२ असे नमवले होते. - बेल्जियमविरूद्धच्या गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाकडून अंतिम फेरीच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.