टोकियो : ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी लाभली आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवल्यास भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक निश्चित करेल. याआधी १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी चौथे स्थान पटकावले होते. ही आतापर्यंत भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली.भारतीय महिलांनी सोमवारी धक्कादायक विजय मिळवताना तीन वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला १-० असे नमवत पहिल्यांदाच ऑलिम्पिक उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र आता ते कांस्यपदकासाठी खेळतील. त्यामुळे आता सुवर्णपदकासाठी भारतीयांच्या सर्व आशा महिला हॉकी संघावर टिकल्या आहेत.ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी जागतिक क्रमवारीत सातवे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. गोलरक्षक सविताच्या नेतृत्वात भारताच्या बचावफळीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळ केला.केवळ एका गोलने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत भारतीयांनी जबरदस्त संरक्षण केले. त्यामुळे आता भारताला पदक मिळवून देण्यासाठी या बचावफळीवर मोठी जबाबदारी असेल.
आत्मविश्वास उंचावलाअर्जेंटिनाच्या महिला संघाने सिडनी २००० आणि लंडन २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. मात्र, अद्याप त्यांना सुवर्ण पटकावता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण ताकदीने खेळ होईल, यात शंका नाही. पहिले तीन सामने गमावल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारली.
भारताचा सुवर्ण स्वप्नभंग... भारतीय पुरुष हाॅकी संघाचे ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न मंगळवारी बेल्जियमकडून उपांत्य सामन्यात ५-२ ने झालेल्या पराभवासह भंगले. कांस्यपदकाची अपेक्षा मात्र अद्याप कायम असून, भारताला जर्मनीविरुद्ध ५ ऑगस्ट रोजी सामना खेळावा लागणार आहे.सामन्यात एकवेळ भारत आघाडीवर होता; मात्र अखेरच्या ११ मिनिटांत तीन गोल गमावणे तसेच अलेक्झांडर हेंड्रिक्स (१९, ४९ आणि ५३ व्या मिनिटाला)याने नोंदविलेली हॅट्ट्रिक या दोन बाबी महागड्या ठरल्या. विश्वविजेत्या बेल्जियमकडून हेंड्रिक्सशिवाय फॅनी लयपर्टने दुसऱ्या आणि जॉनडोहमेनने ६० व्या मिनिटाला गोल केला. भारताकडून हरमनप्रीतसिंग याने सातव्या आणि मनदीपसिंगने आठव्या मिनिटाला गोल केला. बेल्जियम संघ रिओ ऑलिम्पिकचा रौप्य विजेता असून, आज दुसऱ्यांदा त्यांनी ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे.
भारताने दिले १४ पेनल्टी कॉर्नर...आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एकेकाळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या संघाला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते; मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. पराभवासाठी भारतीय संघ स्वत: दोषी ठरला. हेंड्रिक्स आणि लयपर्ट हे पेनल्टी तज्ज्ञ असल्याने भारताच्या डीमध्ये शिरून पेनल्टी कॉर्नर मिळवणे ही प्रतिस्पर्धी संघाची रणनीती होती. त्यात ते यशस्वी झाले. बेल्जियमला एकापाठोपाठ १४ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यात पाचपैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. भारताला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यापैकी केवळ एकावर गोल होऊ शकला.
१९८० च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक स्पेनला ४-३ अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते; पण त्यावेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. त्याआधी १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताचा ०-२ ने पराभव झाला होता.