टोकियो : रविवारी भारताच्या पुरुष हॉकी संघाने चार दशकानंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर आता भारताच्या महिला हॉकी संघानेही ऐतिहासिक कामगिरी केली. सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-० असा धक्का दिला आणि पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरचा सामन्यातील एकमेव गोल आणि गोलरक्षक सविता यांचा खेळ भारताच्या विजयात निर्णायक ठरला.जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय महिलांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. गुरजीतने २२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर सामन्यातील एकमेव गोल करत भारताला आघाडीवर नेले. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत भारताने स्पर्धेतील धक्कादायक विजयाची नोंद केली. गोलक्षक सविताने जबरदस्त खेळ करताना ऑसी आक्रमकांना यश मिळू दिले नाही. तिच्या खेळाने प्रेरित झालेल्या बचाव फळीने नंतर भक्कम संरक्षण करताना ऑसी खेळाडूंना भारतीय गोलक्षेत्रापासून दूर राखले. अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये ऑसी संघाने सातत्याने आक्रमण केले, मात्र भारतीय बचाव फळीने हे आक्रमण यशस्वी होऊ दिले नाही.भारतीय खेळाडूंना यावेळी नशीबाचीही साथ मिळाली. सामन्यात वेगवान सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच मिनिटाला आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. मात्र, स्टीफेनी केरशॉच्या क्रॉसवर एंब्रोसिया मालिनीने मारलेला फटका गोलपोस्टला लागल्याने ऑस्ट्रेलियाला यश मिळाले नाही. यानंतर भारतीयांनी आक्रमक प्रत्युत्तर देत ऑस्ट्रेलियाला दबावात आणले. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताने चांगला खेळ केला. १९ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारतीय बचावपटूंनी ऑस्ट्रेलियाला रोखले. गुरजीतच्या गोलच्या जोरावर आघाडी घेतल्यानंतर भारताने अधिक चपळ खेळ केला. २६ व्या मिनिटाला आणखी एक गोल करण्याची संधी भारताला मिळाली होती, पण यावेळी, सलीमा टेटेचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेल्याने भारताला मध्यंतराला १-० अशा आघाडीवर समाधान मानावे लागले. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राखत भारताने ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरी निश्चित केली.
‘आता सुवर्णच हवे’-हॉकी खेळाडूंच्या कुटुंबीयांची अपेक्षा चंदीगड : आव्हानांचा हिमतीने सामना करीत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांनी, ‘आता सुवर्णपदक जिंकूनच भारतात परत या’अशी अपेक्षा व्यक्त केली. २२ व्या मिनिटाला गोल नोंदविणारी ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौर अमृतसरची. तेथे विजयाचा जल्लोष सुरूच आहे. वडील सतनामसिंग म्हणाले, ‘वाहेगुरुची कृपा आहे. मला मुलीचा अभीमान वाटतो. मुलीने फार मेहनत घेतली.’ कर्णधार राणीचे वडील रामपाल शाहबादमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘मला संघाच्या कामगिरीचा गर्व वाटतो. बालपणी हॉकी खेळण्याचा राणीचा निर्णय योग्य होता. आम्ही सुवर्ण विजयाच्या दारात आहोत. सुवर्ण नक्की जिंकू, असा मला विश्वास वाटतो.’ गोलकीपर आणि विजयाची शिल्पकार सविता पुनियाचे वडील सिरसा येथे म्हणाले, ‘माझ्या मुलीच्या संघाने सुवर्ण जिंकावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मुलींनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पुढेही अशाच कामगिरीच्या बळावर सुवर्ण नक्की जिंकतील.’ हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी महिला आणि पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या.
‘आमच्या मुलींनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारली यावर विश्वास बसत नाही. मजेदार बाब अशी की, सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर अखेरपर्यंत ती कायम राखली. यादरम्यान गोलकिपर सविताची कामगिरी आणि बचाव शानदार होता. आता एक विजय आणखी मिळवावा. हा संघ अर्जेंटिनाला नमविण्यात यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे.’- मीर रंजन नेगी‘दोन दिवस हॉकीमय ठरले. पुरुषांपाठोपाठ महिला संघाने देखील आपल्या कामगिरीद्वारे देशाची विजयी पताका उंचावली. आता एक विजय हवा. पदक जिंकले तर, आनंदाला उधाण येईल.’- अशोक कुमार
ही अविस्मरणीय कामगिरी: सबा अंजूमनागपूर : भारतीय महिलांचा पराक्रम ही ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी कामगिरी आहे. सुरुवातीच्या पराभवानंतर मारलेली ही मुसंडी अधिक प्रशंसनीय असल्याचे मत, भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधार सबा अंजूम यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,‘ आमच्यावेळी आम्ही प्रत्येक सामना हा अखेरचा सामना म्हणून खेळत होतो. सध्याच्या संघात मात्र विजयाची भूक जाणवते. हॉकीत कठोर परिश्रम लागतात. सध्याच्या खेळाडू ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतात, हे पाहून आनंद होतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयात कठोर मेहनत आणि एकीचे बळ जाणवले.’ भारतीय संघात असलेला संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती यामुळे ४१ वर्षानंतर उपांत्य फेरी गाठणे शक्य झाल्याचे पद्मश्रीने सन्मानित अंजूम यांनी म्हटले आहे.
एका चित्रपटाने संघाचा आत्मविश्वास उंचावला - मारिन ‘ऑलिम्पिकमध्ये सलग तीन पराभवानंतर संघाचा आत्मविश्वास तुटला होता. मात्र, यानंतर खेळाडूंनी आत्मविश्वास उंचावणारा एक चित्रपट पाहिला आणि खेळाडूंमध्ये नवे चैतन्य संचारले. या जोरावर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली,’ अशी माहिती भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड मारिन यांनी दिली.
मारिन म्हणाले की, ‘स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास करण्याने फरक पडला. यामुळे भूतकाळ लक्षात ठेवून वर्तमानाचा सामना करण्यात अडचण येणार नव्हती. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती आणि आम्ही तेच केले. जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा तुम्ही स्वत:वर विश्वास करणे सोडत नाही. हेच मी मुलींना सांगितले. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मी त्यांना एक चित्रपट दाखवला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान आम्ही याच चित्रपटाविषयी बोलत राहिलो’.
भिंत बनून उभी राहिली गोलकीपर सविता पुनिया महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनिया भारतासाठी ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ ठरली. सविता उपकर्णधारदेखील आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात तिने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सविताने या सामन्यात तब्बल नऊ पेनल्टी कॉर्नर परतवून लावले. यापैकी एकाही पेनल्टी कॉर्नरवर प्रतिस्पर्धी खेळाडूंचा गोल झाला असता तर भारताला विजयाची चव चाखता आली नसती. या अर्थाने सविता हीच विजयाची शिल्पकार ठरली.