बंगळुरू : आम्ही सध्या चांगल्या लयीत असून टोकियो ऑलिम्पिक स्थगित झाल्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू, असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा आघाडीचा खेळाडू सिमरनजित सिंग याने व्यक्त केला.आठवेळच्या चॅम्पियन भारतीय संघांच्या कामगिरीचे आकलन करण्यासाठी सध्या वेळ मिळत असल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘आॅलिम्पिक एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याने थोडी निराशा आहे. आम्ही गेल्या वर्षभरापासून चांगल्या लयीत आहोत. आम्ही आॅलिम्पिकची चांगली तयारी केली होती. मात्र आरोग्याच्या दृष्टीने आॅलिम्पिक स्थगित करण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे. ’सिमरनजित म्हणाला, ‘आम्ही या वेळेचा वापर चांगला संघ बनण्यासाठी वापरणार आहोत. यासाठी आम्ही आणखी कठोर मेहनत करणार आहोत. ’ भारतीय हॉकी संघ सध्या लॉकडाऊनमुळे बंगलोर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण परिसरात आहे. तो म्हणाला, ‘मला घरच्यांची आठवत येत आहे. मी यावेळी कुटुंबासमवेत राहणार होतो; मात्र येथे सरावाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. सर्व काही लवकरात लवकर ठीक होईल. आम्ही सध्या आमच्या मागील सामन्यातील चुकांवर लक्ष केंद्रित केले असून त्याचे व्हिडिओ पाहून त्यावर काम करत आहोत.’
आम्ही चांगली कामगिरी करत आहोत : सिमरनजित सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:47 AM