कोलकाता : ज्यांच्या खेळाची जादू डोळ्यांत साठविण्यासाठी जगभरातील हॉकीप्रेमी मैदानांवर गर्दी करायचे, असे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना आकसापोटी रांगेत उभे करून सामन्याचे तिकीट काढायला सांगण्यात आले होते, हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. पण दुर्दैवाने असे घडले होते. विशेष म्हणजे, पतियाळा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) मुख्य प्रशिक्षक असताना त्यांच्यासोबत असे वर्तन करण्यात आले होते.
भारताला आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणा-या भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार गुरबख्शसिंग यांनी ‘माय गोल्डन डेज’ आत्मचरित्रात हा दावा केला आहे. १९६४ च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. ‘माय गोल्डन डेज’ या पुस्तकात त्यांनी ध्यानचंद यांना देण्यात आलेल्या या अपमानास्पद वागणुकीचा खुलासा केला आहे.
१९६० आणि ७०च्या दशकात भारतीय हॉकीच्या पतनाला प्रारंभ झाला, हॉकीतील राजकारण खालच्या थराला गेले, असे मत त्यांनी नोंदविले. या पुस्तकात गुरबख्क्षसिंग यांनी ध्यानचंद यांचशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ध्यानचंद यांना मासे पकडायला खूप आवडायचे. स्वत: माशांचे विविध प्रकार बनवून मित्रांसह खाणे, ही त्यांची आवड होती, असा उल्लेख त्यांनी केला आहे.साई-हॉकी महासंघातील वादाचा फटका१९६२मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ही घटना घडली होती. पतियाळा येथील ‘साई’ केंद्र आणि भारतीय हॉकी महासंघ यांच्यात त्यावेळी वाद होता. त्याचा फटका ‘साई’चे मुख्य प्रशिक्षक असलेल्या ध्यानचंद यांना बसला. ध्यानचंद आपल्या खेळाडूंसह स्पर्धेतील सामने बघण्यासाठी अहमदाबादला आले होते. त्यावेळी सामने बघण्यासाठी त्यांनाा प्रवेशपत्र नाकारण्यात आले. यामुळे प्रत्येक लढतीचे तिकीट काढण्यासाठी खेळाडूंसह रांगेत उभे राहण्याची वेळ ज्यांच्या नावाने आपण राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करतो, अशा महान खेळाडूवर आली, असा दावा गुरबख्क्षसिंग यांनी केला.ध्यानचंद परिपूर्ण खेळाडू होते!भारतीय हॉकीला सुवर्णयुग दाखविणाºया खेळाडूंचा आदरपूर्वक उल्लेख गुरबख्क्षसिंग यांनी आत्मचरित्रात केला आहे. ‘‘बलबीरसिंग सिनियर गोल करणाºया भारतीय खेळाडूंपैकी सर्वांत सरस खेळाडू होते. यात त्यांचा हात धरणारा कुणीही नव्हता. के. डी. सिंगबाबू सर्वाेत्तम ड्रिबलर होते. तर ध्यानचंद हे सर्वोत्तम परिपूर्ण खेळाडू होते,’’ अशा शब्दांत त्यांनी भारतीय हॉकीतील दिग्गजांचे योगदान अधोरेखित केले आहे.