इपोह : विश्वचषकात भारतीय हॉकी संघाला तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागणार आहे. काल आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने नोव्हेंबरमध्ये होणा-या हॉकी विश्वचषकाची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारीन यांनी गाफील राहून चालणार नाही, असा खेळाडूंना इशारा दिला.यंदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन भुवनेश्वरमध्ये होत आहे. स्पर्धेत भारताचा समावेश ‘क’ गटात असून, भारताला आॅलिम्पिक रौप्यविजेत्या बेल्जियम, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत. मारिन म्हणाले, ‘हा विश्वचषक असल्याने प्रत्येक संघ जिंकण्याच्या इराद्याने खेळेल, यात शंका नाही. आमचा गट कठीण किंवा सोपा आहे, हे आम्ही ठरवूच शकत नाही. विश्वचषकात रँकिंगला अर्थ नसतो. प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा सन्मान करावा लागेल. आम्हाला प्रत्येक सामन्यावर फोकस करीत विजय मिळवावा लागेल.’भारताचा पहिला सामना २८ नोव्हेंबर रोजी द.आफ्रिकेविरुद्ध होईल. २ डिसेंबर रोजी बेल्जियमविरुद्ध आणि त्यानंतर ८ डिसेंबर रोजी कॅनडाविरुद्ध सामना खेळला जाईल. मारिन पुढे म्हणाले, ‘बेल्जियम जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक आहे. आम्ही त्यांना विश्व लीगच्या फायनलमध्ये धूळ चारली होती. यानंतरही आम्ही कुठल्याही संघाविरुद्ध गाफील राहणार नाही.’ भारतीय संघ येथे सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धा खेळण्यासाठी आला असून, पहिला सामना अर्जेंटिनाविरुद्ध शनिवारी होईल. विश्वचषकाची स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यामुळे घरच्या मैदानावर खेळत असलो तरीही आम्हाला गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक सामना जिंकून खेळात सुधारणा करण्याकडे आमचा कल असणार आहे. सुलतान अझलान शाह स्पर्धेसाठी मलेशियात पोहोचलेल्या शोर्ड मारिन यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे.विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. यानंतर भारताला बेल्जियम आणि कॅनडाविरुद्ध दोन हात करायचे आहेत. बेल्जियम हा आमच्यासाठी सर्वात कडवा प्रतिस्पर्धी आहे. मात्र याआधीच्या काही स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना मात देऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे विश्वचषकात या इतिहासाची पुनरावृत्ती करायला आम्हाला आवडेल. मात्र कोणत्याही संघाला कमी लेखून आम्हाला चालणार नाही. मारिन यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या तयारीबद्दल माहिती दिली. (वृत्तसंस्था)>यंदा मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होणार आहेत. त्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. केवळ एखाद्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यावर फोकस करणार नाही. आशियाड, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर विश्वचषकाचे आयोजन होईल. प्रत्येक स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा फिटनेस स्तर उत्तम राहील, या दृष्टीने वैज्ञानिक सल्लागार रॉबिन अर्केल यांनी योजना आखली आहे. - शोर्ड मारिन, कोच भारतीय हॉकी संघ
विश्वचषकात गाफील राहणार नाही : मारिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:55 AM