मुंबई - महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत 44 वर्षांनंतर भारतीय महिला संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची स्वप्न थोडक्यात हुकले. कडव्या संघर्षानंतरही भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. त्याचबरोबर 2022च्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची संधीही गमावली. पण, स्पर्धेतील एकंदर कामगिरीवर क्रीडा जगतातील दिग्गजांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत संपूर्ण 60 मिनिटे आयर्लंडच्या आक्रमणपटूंना रोखले. आयर्लंडचे खेळाडू सातत्याने पेनल्टी क्षेत्रावर आक्रमण करत असताना भारतीय बचावपटूंनी त्यांना यश मिळू दिले नाही. गोलरक्षक सविता पुनियाला याचे अधिक श्रेय द्यायला हवे. पेनल्टी शूटआऊटमध्येही तीने आयर्लंडचे प्रयत्न रोखले, परंतु निर्णायक क्षणी तिला अपयश आले.
माजी ऑलिम्पिक धावपटू पी. टी. उषा यांनीही भारतीय खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्या म्हणाल्या, तुम्हा मुलींचे अभिनंदन. निकाल जरी आपल्याला हवा तसा लागला नसला तरी तुम्ही दाखवलेल्या संघर्षाला सलाम.
केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही कौतुक करणारे ट्विट केले.